सुशिक्षित बेरोजगारभत्ता

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

आज दरमहा बॅंकेत पगार जमा होतो. त्यातून मनासारखा खर्च करतो. कुटुंबाबरोबर हॉटेलिंग करतो. पण, बेरोजगार भत्यातून आपले खर्च भागवण्याची, मैत्रिणींबरोबर पेरू खाण्याची मजा काही और होती.

आज दरमहा बॅंकेत पगार जमा होतो. त्यातून मनासारखा खर्च करतो. कुटुंबाबरोबर हॉटेलिंग करतो. पण, बेरोजगार भत्यातून आपले खर्च भागवण्याची, मैत्रिणींबरोबर पेरू खाण्याची मजा काही और होती.

साधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वी एस. एस. सी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबरोबर आईवडील आपल्या मुला-मुलींना एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंजमध्ये नोकरीसाठी कार्ड काढावयास सांगत असत व मग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्या, असा मोलाचा सल्ला देत असत. ती तेव्हाची रीतच झाली होती. त्या वेळी रोजगार विनिमय केंद्रासमोर तरुण-तरुणींची भलीमोठी रांग असे. नोकरीसाठी "कॉल' पाठवताना या केंद्राकडूनच गेला पाहिजे अशी अट होती. हातांना काम देणं ही सरकारची जबाबदारी मानली जात होती.

आम्हीही सर्व मैत्रिणींनी एस. एस. सी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबरोबर एकाचवेळी रोजगार केंद्रात नाव नोंदवून कार्ड काढलेले होते. त्यानंतर लगेच महाविद्यालयात पुढील शिक्षण सुरू झाले होते. त्या वेळी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांची गर्दी अधिक व नोकऱ्या कमी अशी स्थिती होती. त्यामुळे एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंजचे कार्ड काढल्यानंतर चार-पाच वर्षे जर या केंद्राकडून नोकरी मिळाली नसेल, तर त्या तरुण-तरुणींना राज्यशासनाकडून सहा महिन्यातून एकदा पन्नास रुपये असा बेरोजगार भत्ता मिळत असे. पुढे तीन वर्षे म्हणजे सहा वेळा सुशिक्षित बेरोजगार म्हणून भत्ता देण्यात येत असे. बेरोजगार भत्त्याची रक्कम पुणे येथील शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरीत मिळत असे. त्या वेळी आम्ही सर्व मैत्रिणींनी एकाचवेळी एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंजचे कार्ड काढल्याने व आम्हां कुणाही मैत्रिणींना नोकरी लागलेली नसल्याने आम्हाला एकाचवेळी एकाच दिवशी सुशिक्षित बेरोजगार भत्ता घेण्याचे पत्र येई. त्या वेळी आम्ही शिक्षण घेत होतो. मग पत्र मिळताच आम्ही खूप आनंदात असू.

लवकरातला लवकर दिवस ठरवून आम्ही सर्व मैत्रिणी भत्ता आणावयास जात असू. त्या भत्त्याच्या रकमेचे काय करायचे याच्या नियोजनाचीही मनामध्ये वारंवार उजळणी करीत असू. मग आपणही घरातल्या खर्चाचा थोडा खारीचा वाटा उचलावा असे. प्रत्येकीला वाटत असे. मग आई-वडिलांना या महिन्याची टायपिंगची फी तुम्ही भरू नका, आम्ही भत्त्याच्या रकमेतून ती भरू असे सर्व जणी आपापल्या घरी सांगत असू. त्या वेळी पन्नास रुपये ही रक्कम फार मोठी असे. भत्त्याची रक्कम मिळाल्यानंतर त्या रकमेतून टायपिंगची फी भरल्यानंतरही बऱ्यापैकी रक्कम शिल्लक राहत असे. मग त्या रकमेतून स्वतःजवळ नसलेले अभ्यासाचे पुस्तक विकत घेतले जाई. सर्व मैत्रिणी एखादा चांगला चित्रपट बघत असू. त्या काळी हॉटेलमध्ये खाण्याचे वेड कोणालाच नव्हते. तेव्हा एखादा पेरू घेऊन आम्ही तो खात असू व राहिलेली रक्कम मोठ्या भावाकडे किंवा बहिणीकडे ठेवावयास देत असू. गरज पडली तर तेही तत्परतेने ती रक्कम आम्हाला परत देत असत.

पैसे संपवले की मग परत सहा महिन्यानंतर आम्ही पोस्टमनची, बेरोजगारभत्ताची वार्ता देणाऱ्या पत्राची वाट चातकाप्रमाणे पाहात असू. मग उगाचच काही मैत्रिणींच्या घरी जाऊन त्यांची थोडी चेष्टामस्करी करीत असू. आम्हाला भत्ता घेण्याचे पत्र आलेले आहे. तुम्हाला अजून आलेले नाही का? अशी थोडी बनवाबनवी केली जात असे.

कालांतराने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. आम्हा सर्व मैत्रिणींना नोकऱ्याही लागल्या. नोकरी लागल्यानंतर बेरोजगारभत्ता बंद झाला. पुढे हा भत्ता बेरोजगारांना देण्याचे राज्यशासनानेही बंद केले. अर्थात त्या वेळचा तो बेरोजगारभत्ता अजूनही आमच्या स्मरणात आहे. त्याची आठवण कितीतरी आनुषंगिक आठवणी चाळवत जाते आणि त्याकाळात पोचण्याचा एक अविस्मरणीय आनंद मिळतो. बेरोजगारभत्ता घेण्याचे पत्र लवकर आले नाही, तर होणारी तगमग, पत्र आल्यानंतर तो प्राप्त करण्यासाठी होणारा आटापिटा, ती अंतःकरणाची धडपड, एकमेकींना उल्लू बनविण्याची ती मौज आणि या साऱ्या भावभावनांच्या खेळामधून मिळणारा तो अपरिमित आनंद आज राहिलेला नाही. आज कितीतरी जणांना बेरोजगारभत्ता काय होता हे माहिती नसेल. त्याची हुरहूर, गंमत, आपले स्वतःचे पैसे असल्याची श्रीमंती अनुभवता येत नसेल. मात्र, आमच्या पिढीला या बेरोजगार भत्त्यानेच रकमेचे नियोजन शिकवले. बचतीची सवय लावली. काही काळ का होईना; पण आमची गरज भागविणारा आमचा आधार होऊन राहिला सुशिक्षित बेरोजगारांचा बेरोजगारभत्ता! आज दरमहा बॅंकेत पगार जमा होतो. त्यातून मनासारखा खर्च करतो. कुटुंबाबरोबर हॉटेलिंग करतो. पण ती मजा काही और होती. रस्त्याने जाताना एखादा पेरूवाला दिसतो तेव्हा बेरोजगारभत्यातून मैत्रिणींच्या बरोबर पेरू खाणारी मीच आठवत असते मला!