आंबा पिकतो...

आंबा पिकतो...

आंऽबा पिकतो.. रस गळतो... आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. हा आंबा मिळवण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो. आंबा मिळवण्यासाठी तो काहीही करू धजतो. एकदा का आंबा मिळाला की तो तृप्त होतो.

उन्हाळ्याचे दिवस. आम्ही कोकणच्या माहेरवाशिणी मुंबईला घरच्या आंब्याची वाट बघत असायचो. आमचे भाऊ प्रेमाने आम्हा सर्वांना आंब्याच्या पेट्या पाठवायचे. त्या वेळी कोकणात वाहतुकीची एवढी साधने नव्हती. ना कोकण रेल्वे, ना टेम्पो, ना ट्रक. मग एस.टी.च्या टपावर भाऊ पेट्या चढवून द्यायचे आणि आम्ही बहिणी बॉम्बे सेंट्रलला जाऊन टॅक्‍सीने अथवा आपापल्या वाहनाने त्या घरी घेऊन यायचो.

असेच एका वर्षी भावाचे पत्र व त्याबरोबर आंब्यांच्या पेट्यांची पावती आली. ती पावती दाखवली की एस.टी.वाले आम्हाला पेट्या स्वाधीन करायचे. पत्र आल्याच्या दुसऱ्या दिवशीच गेले स्टॅंडवर; पण हमाल सापडेना. आली का पंचाईत! मी इकडे-तिकडे पाहात एका साधारण कपडे घातलेल्या मुलाला चाचरतच विचारलें, ""अरे, मी आंब्याची पेटी न्यायला आली आहे; पण उचलायला कोणी मिळत नाही, नेशील का जरा टॅक्‍सीपर्यंत? पैसे देईन मी त्याचे.'' हे ऐकताच तो उखडलाच माझ्यावर. म्हणाला, ""ओ, हमाल वाटलो काय मी तुम्हाला. तुम्ही शहराची माणसे लई शाणी समजता स्वतःला. गावच्या बसची वाट बघत उभा आहे मी. पैशाची भाषा आम्हाला नाय कळत. जा. दुसरे शोधा कोणीतरी.'' मी सटकलेच तिथून.

तेवढ्यात एक कृश स्त्री, काहीसा ओशाळलेला, काहीसा त्रस्त असा चेहरा, एका हातात चेपलेले काळपट ऍल्युमिनियमचे भांडे अशा तऱ्हेने धरलेले, जसे काही त्यात नको ते घेऊन चालली आहे. खांद्यावर लटकवलेली पर्स, दुसऱ्या हाताच्या चिमटीत धरलेले सतरंजी नामक काहीतरी आणि तिच्यामागे मळके फाटके कपडे घातलेला, डोक्‍यावर आंब्याची पेटी दोन्ही हातांनी सावरत लंगडत चालणारा माणूस, अशी वरात येताना दिसली. ती स्त्री काहीशी परिचित वाटत होती. जवळ जाऊन पाहते तर काय? एकदम माझ्या तोंडून निघून गेले, ""अगं बाई, प्रभा.'' ती एकदम चमकली, मी विचारले ""काय गं हे?'' ती उद्वेगाने सांगू लागली, ""अगं काय सांगू? मी इथे केव्हाची आलेली आहे. पावती दाखवून पेटी ताब्यात घेतली आणि हमाल शोधत होते. एक मिळेल तर शप्पथ. किती जड आहे पाहिलेस का? टॅक्‍सीपर्यंत तरी न्यायला हवी ना! कुठे दूरपर्यंत शोधत जाईन म्हटले तर पेटी ताब्यात घेऊन बसले. सोडून कशी जाऊ? शेवटी हा कोपऱ्यात बसला होता. त्यालाच विचारले, "काय रे नेशील का पेटी पुढपर्यंत?' तयार झाला बाई एकदाचा. हुश्‍श म्हटले; पण त्याची आणखी अडचण सांगू लागला. "बाई, म्या पेटी न्हेतो, पैकं भी द्याल. पर त्या पायात ह्या माझ्या कांगरुणाचं काय करूं? ते चोरले कुणी तर जिमनीवर झोपू काय?'' ते सगळे सांभाळत ती टॅक्‍सीकडे निघाली. तिची ती त्रासिक मुद्रा, चालताना भांड्यातल्या पैशाचा होणारा आवाज, हे सगळं पाहून मला अगदी हसू आवरेना.
000

आम्ही मुलांकडे अमेरिकेला जायला मुंबई विमानतळावर पोचलो. सिक्‍युरिटी चेकच्या कॅमेराखालून सामान जाऊ लागले आणि इकडून माणसे. एका चांगल्याच ठासून भरलेल्या बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडली. बॅग वेगळी ठेवली गेली आणि त्याच्या मालकाविषयी विचारणा सुरू झाली. माझा अंदाज खरा ठरला. ती बॅग आमच्या पुढच्या सेठाणीची होती. इन्स्पेक्‍टरने बॅग उघडायला सांगितली. उघडल्याबरोबर घमघमाट सुटला आंब्याचा. इन्स्पेक्‍टर म्हणाली, ""हं... मुझे लगा ही था इसमें आम हैं। सामान जॉंचने की जरूरत ही नहीं। चलो निकालो ये आम। नहीं ले जा सकते।''
सेठाणी म्हणाल्या, ""मारो ढीकरानु बहु भावे छे। इसलिए लेके जा रही हूँ।'' ""देखो, तुम भी एक मॉं हो। तुम जानती हो की, मॉं को कितना चाव होता है बच्चों को खिलाने का। जाने दो ना!''

इन्स्पेक्‍टर कठोर. नाईलाजाने तिने आंबे बाहेर काढायला सुरवात केली. सहा आंबे बाहेर पडले. काय सुंदर फळ होते. एवढे मोठे आणि रसरशीत.
काय करावे आता तिला सुचेना. एकाएकी त्या माऊलीच्या डोक्‍यात कल्पना आली. जवळच्या स्टॉलमध्ये जाऊन सुरी आणली. त्या आंब्याचे काप काढू लागली. सगळीकडे आम्रगंध दरवळला होता. त्या सगळ्या फोडी तिने एका कागदाच्या प्लेटमध्ये ठेवल्या आणि सिक्‍युरिटी स्टाफसह सर्व प्रवाशांना वाटल्या. सगळे काम थांबवून आंबे खाण्यात गुंतले. सेठाणीबाई बसल्या. त्यांनी सर्व कोयी चोखून - चोखून स्वच्छ केल्या. कोयी कचऱ्याच्या डब्यात पडल्या आणि बाई हात पुसून सामान घेऊन पुढे चालू लागल्या आणि आमची रांग पुढे सरकू लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com