नेपाळची सायकलसफर

विजय बोरगावकर
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

तुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे.

तुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे.

लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट नेपाळमधे जायचे ठरवले. त्या काळी आजच्यासारखे गुगल नव्हते. त्यामुळे रस्ते आणि उतरायची ठिकाणे याची माहिती सहज उपलब्ध नव्हती. आम्हाला वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल्स कंपनीने बनवलेले नकाशे मिळाले. यामधे भारतामधील तेव्हाचे रस्ते आणि कोणत्या गावामधे काय काय आहे याची माहिती दिलेली होती. हे नकाशे वापरून आम्ही आमचा रोडमॅप बनवला. सुमारे सहा महिने पूर्वतयारी केल्यानंतर आम्ही पुणे- नेपाळ व परत या सफरीसाठी तयार झालो. एकूण पाच हजार किलोमीटरच्या सहलीसाठी सुमारे त्रेपन्न दिवस प्रवास करावा लागणार होता.

शनिवारवाडा येथून माझे काका श्रीकांत बोरगावकर, अनिल पंडित आणि मी रवाना झालो. आम्ही बऱ्याच वेळा रात्रीचा मुक्काम पोलिस ठाण्यात करत असू. मध्य प्रदेशमध्ये नर्मदेजवळ पावसाचे थैमान सुरू झाले होते. नदीवरील पूल बंद केले होते. वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. आम्हाला या पुरातूनदेखील पुढे जाणे अतिशय आवश्‍यक होते. नाहीतर आमचे वेळेचे गणित चुकले असते. एके ठिकाणी तातडीत असलेल्या लोकांना भर पुरामधून नावेने पैलतीरावर पोचवण्याचे काम चालले होते. आम्हाला सायकलींसह नदीपलीकडे सुखरूपपणे पोचते केले. चंबळच्या खोऱ्यातून पन्नास किलोमीटर प्रवास होता. तिथल्या डाकूंच्या गोष्टी ऐकून होतो. मनावर दडपण आले होते. चंबळमध्ये प्रवेश केल्यानंतर सुमारे दोन तासांनी आम्हाला भूक लागली. एका धाब्यावर थांबलो. धाबा मालकाने आमची चौकशी केली आणि पुण्यापासून सायकलवरून आलो आणि पुढे नेपाळला जाणार म्हटल्यावर तो भलताच खूष झाला. तिथे असणाऱ्या सर्व लोकांनी टाळ्या वाजवून आमचे कौतुक केले. चहा-नाश्‍त्याचे पैसे न घेता आम्हाला निरोप दिला. पुढे पन्नास किलोमीटरनंतर परत आम्ही एका हॉटेलमधे थांबलो. तेथे समजले की, आम्ही आधी थांबलो होतो तो धाबा तिथल्या डाकूंचा अड्डा होता. सोनोली सीमेवरून आम्ही नेपाळमधे प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay borgaonkar write article in muktapeeth