ऑपरेशन राइट आय

विजय वैद्य
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

डोळे आनंदाने चमकतात. दुःखाने भरतात, प्रेमाने लवतात अन्‌ क्रोधाने अंगार ओतू लागतात. डोळ्यांची रूपे वेगवेगळ्या वेळी निरनिराळी जाणवतात.

डोळ्यांच्या नियमित तपासणीच्या वेळेस उजव्या डोळ्यात मोतीबिंदू असल्याचे निदान नेत्रतज्ज्ञानी केले आणि शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. डोळे या छोट्या अवयवाची ऐट न्यारीच! त्याला मधुमेह, रक्तदाब व हृदयविकार यांचा सहवास चालत नाही. या तिन्ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच शस्त्रक्रियाकक्षात प्रवेश मिळतो.

डोळे आनंदाने चमकतात. दुःखाने भरतात, प्रेमाने लवतात अन्‌ क्रोधाने अंगार ओतू लागतात. डोळ्यांची रूपे वेगवेगळ्या वेळी निरनिराळी जाणवतात.

डोळ्यांच्या नियमित तपासणीच्या वेळेस उजव्या डोळ्यात मोतीबिंदू असल्याचे निदान नेत्रतज्ज्ञानी केले आणि शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. डोळे या छोट्या अवयवाची ऐट न्यारीच! त्याला मधुमेह, रक्तदाब व हृदयविकार यांचा सहवास चालत नाही. या तिन्ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच शस्त्रक्रियाकक्षात प्रवेश मिळतो.

व्यवस्थापनाचा कोटा व इतर लागेबांधे येथे चालत नाहीत. कारण स्वच्छ व पारदर्शक व्यवहाराच डोळ्यांना योग्य तो न्याय देऊ शकतात ना ! सुदैवाने या तिन्ही प्रवेश परीक्षा अस्मादिकांनी पहिल्याच फटक्‍यात ओलांडल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी मानसिक तयारी लगेचच झाली. डॉक्‍टरांनी आपले शल्यकौशल्य वीस मिनिटांत पूर्ण केले. दोन तासांतच मी काही पथ्य पाळण्याच्या सूचनेचे पत्रक घेऊन घरी आलो. "डोळ्यात वाच माझ्या...' असे आपल्या पत्नीलाही म्हणण्याची सोय नव्हती. कारण डोळ्यावर पट्टी व काळा चष्मा होता. उलट तिनेच मला "धीरे से आजा रे अखीयनमें निंदिया आ रे आजा...' ऐकण्याचा बहुमोल सल्ला दिला.

गीतकारांनी डोळ्यांवर भरपूर गाणी लिहिली आहेत. कुणा प्रेयसीला प्रियकराचे डोळे जुलमी वाटतात, तर कुणी "लिखा है तेरी आँखोंमे किसका अफसाना...' म्हणत त्याला साद देत असते. त्या उलट प्रियकराला तिचे डोळे मद्याच्या प्याल्यासारखे दिसतात. तर कोणी "आँखों ही आँखोंमे इशारा हो गया बैठे बैठे जीनेका सहारा हो गया...' म्हणत भविष्यात काळजीचे कारण नसल्याची ग्वाही देत असतो. अस्मादिकांना मात्र सज्ञान झाल्यापासून बोहल्यावर चढेपर्यंत कोणाला इशारा करण्याची वेळ आली नाही. "इस पार या उप पार' असे म्हणत आम्ही थेट विचारून मोकळे झालो. सुदैवाने "इस पार' मध्येच राहिलो.

एका हिंदी चित्रपटात उमादेवी आपल्या प्रियकराला "आँखों में रंग भरके तेरे इंतजार का...' म्हणत असली तरी परमेश्‍वराने मात्र माणसाच्या डोळ्यांत अगोदरच रंग भरून त्याला पृथ्वीतलावर पाठविले आहे. म्हणूनच काहींचे डोळे, निळे, पिंगट तर काहींचे घारे असतात. काळे व निळे डोळे असलेल्या व्यक्तींचे घाऱ्या मंडळीविषयी फारसे चांगले मत नसते. त्यामुळे काळे-निळे डोळेवाले घाऱ्या मंडळींचे नावही कधी घेत नाहीत, ते नेहमीच टोपणनावाने त्यांचा उल्लेख करतात. पण माझ्यासारख्या "घारू अण्णा'ने त्याबद्दल अधिक काय लिहावे?

काही जणांचे डोळे हरणांसारखे असतात. तर काहींचे बटबटीत. बोलके डोळे असणाऱ्या काही स्त्रिया याचा वापर योग्य रीतीने करतात. त्यामुळे तोंडाची वाफ न दवडता नवऱ्यावर नियंत्रण ठेवायला हे अस्त्र उपयोगी पडते. (हे वाक्‍य मी हा लेख पोस्टात टाकण्याच्या वेळेस समाविष्ट केले आहे. त्यामुळे माझ्या हितचिंतकांना मी थोड्या वेळाने एखाद्या हॉटेलमध्ये किंवा टपरीवर नाश्‍ता व चहा घेताना दिसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.) थोडक्‍यात, डोळे सौंदर्यात भर पाडून व्यक्तिमत्त्वाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करत असले, तरी प्रशासन विभागाकडील कामासाठीही त्यांची आपल्याला मदत होत असते. एरवी एक दिवसाची किरकोळ रजा मंजूर करताना कुरकुर करणारा "बॉस' डोळे आलेल्या कर्मचाऱ्याची रजा आढे-वेढे न घेता मंजूर करत असतो. खरे-खोटे करण्याच्या भानगडीत तो पडत नाही. कारण समोरच्या व्यक्तीचा गॉगल काढला तर लागण होईल ही भीती ! इतकेच नव्हे तर एखादा त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तरी त्याला घरी दूरध्वनी करून कार्यालयात येण्याविषयी सांगण्याचे धाडस करत नाही.

डोळ्यांमध्ये दुःखद प्रसंगी येणारे अश्रू भावनांचे ओझे हलके करतात. तर नववधूला सासरी पाठविताना तिची आई अश्रूंना गंगा-यमुनेची उपमा देते. एखाद्या आरोपीवर गुन्हा सिद्ध करण्यात त्याचे हेच डोळे साक्ष देऊन फिर्यादीला मदत करत असतात. इतकी उपयुक्तता असणाऱ्या डोळ्यांचे कितीही गुणगान केले असले तरी त्याची पण दोषारोपातून सुटका नाही. अमूक अमूक व्यक्तीची नजर चांगली नाही असे म्हणत "बुरी नजरवाले तेरा मूँह काला' असे लिहिण्यापर्यंत त्यांच्यावर ठपका ठेवला जातो. शिवाय "मी भरते तर तू का जळते', "पाहा, पण प्रेमाणे' ("ने' नाही "णे' च) अशी वाक्‍येही त्यात भर घालतात. असा हा डोळ्यांचा महिमा!

आता शस्त्रक्रिया झाली. पण जेव्हा मला दूरचे चांगले दिसत होते, तेव्हाही मला दूरदृष्टी कशी नाही, हेच घरून ऐकून घ्यावे लागत होते. शस्त्रक्रियेनंतरच्या सात-आठ दिवसांच्या विश्रांतीमुळे त्यांची महती अधिकच जाणवली. एखाद्या अंध व्यक्तीचे जीवन आपल्या एका छोट्या, पण अत्यंत उपयुक्त अशा अवयवामुळे प्रकाशमय होणार असल्यामुळे मी नेत्रदानाचा निर्णय घेतला. एरवी, त्यांच्या लेखी "दृष्टीआड सृष्टी' असते ना!

Web Title: vijay vaidya write article in muktapeeth