समाधानाचे क्षण

muktapeeth
muktapeeth

म्हटले तर आपण काही विशेष केलेले नसते. आपल्याच विद्यार्थिनीला थोडीशी मदत केलेली असते. पण पुढे ती विद्यार्थिनी काही यश मिळवून समोर उभी राहते, तेव्हाचा क्षण समाधानाचा असतो.

दारावरची बेल वाजली. कोण आले असेल बरे, असा विचार करतच दार उघडले, तो दारात कुबड्या सावरत एक तरुणी उभी होती. हिला कोठेतरी पाहिले आहे ! पण कोठे ते आठवेना. तिला आत बसायला सांगितले.

""बाई, मला ओळखलेत का? मी तुमची विद्यार्थिनी. अनिता मदिकुंट. तिसरीत तुमच्या वर्गात होते.'' तिने आठवण दिली आणि ती पटकन आठवलीही. ""तुम्ही माझ्यावर चांगले संस्कार केलेत; मला वाचनाची गोडी लावलीत. तुमच्या मार्गदर्शनामुळे मी एवढा पल्ला गाठू शकले. मी एम.ए. झाले. त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला पेढे द्यावेत म्हणून शाळेतून पत्ता घेऊन मी आज आले.''
मी सेवानिवृत्त आहे. शाळेत असतानाचे ते दिवस आठवले. अनिताची मला दया यायची. तिची शिकण्याची तळमळ व जिद्द पाहून कौतुकही वाटायचे. पोलिओमुळे तिला कुबड्या वापराव्या लागत असत. बूट घातले, की कळा यायच्या. रग लागायची पायांना. तिची आई खूप मेहनत घ्यायची. वेळ पडली तर उचलून आणायची. मुले हसायची, ती नाराज व्हायची. एवढ्याशा मुलीने कष्टप्रद असे शरीराला झोके देत कुबड्याच्या साह्याने एक एक पायरी चढून जायचे, माझा जीव गलबलून जायचा. शेवटी काही शिक्षकांच्या रोषाला सामोरे जाऊन वरिष्ठांच्या परवानगीने माझा वर्ग खालच्या मजल्यावर आणून घेतला.
एक दिवस शाळा सुटल्यावर काही मुले सांगत आली. बाई अनिता रडते आहे. वर्गात अनिता हुंदके देऊन रडत होती. ""काय झाले?''
""बाई, अजूनही माझी आई आली नाही.''
""अगं, काही काम असेल म्हणून आईला थोडा उशीर झाला असेल?''
""नाही बाई, आईला कधीच उशीर होत नाही.''
""बरं, मी तुला घरी सोडते, आता रडणे थांबव, हास बरं?'' माझे काम आटोपल्यावर मी तिला रिक्षातून घरी पोचवले. आई तिला आणायलाच निघाली होती. पण घाईघाईत तिचा पाय मुरगळला म्हणून हा घोटाळा झाला.
आई म्हणाली, ""बाई तुम्हाला त्रास झाला. धन्यवाद.''
""अहो, त्रास कसला? माझी विद्यार्थिनी आहे. तिच्यासाठी एवढेसुद्धा करू नको का?'' तिची शिकण्याची तळमळ, जिद्द पाहून मी हळवी होत असे. तिच्यासाठी काहीतरी करावे असे मला नेहमीच वाटत असे. ती हायस्कूलमध्ये गेल्यावरही अधूनमधून मी तिच्या घरी जात असे. कधी कधी ती खिन्न बसलेली असे. तिला बरोबरीच्या मुलांत मिसळता येत नसे. एकटी बसून कंटाळायची. मी तिची समजूत घालत असे. तुझे वाचन वाढव, त्यात प्रगती कर, निराश न होता परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायचे. तिला वेगवेगळी पुस्तके नेऊन देत असे. त्यामुळे ती खूष होत असे. तिला वाचनाची गोडी लागली. दिवसातील काही वेळ ती शिकवण्या घेऊ लागली. आपले शिक्षणही तिने चालू ठेवले. तिची निराशा कमी होऊ लागली. तिचा योग्य मार्ग तिला सापडला. पुढे ते कुटुंब लांब राहायला गेले. त्यामुळे मला काहीच समजू शकले नाही. आज इतक्‍या वर्षांनी माझी विद्यार्थिनी घवघवीत यश घेऊन माझ्यापुढे उभी होती. ती व मी खूप आनंदात होतो. ""पेढे घेता ना बाई?''
""अं, हो!'' मी भूतकाळातून वर्तमानात आले. पेढे घेऊन, तिला जवळ घेतले. थोपटले, तिला आनंदाश्रू आवरेनात. तिचे अश्रू पुसून चहापाणी केले. तिच्या आवडीचे बक्षीस तिला दिले. आशीर्वाद दिला. माझेही मन सद्‌गदित झाले.
इतक्‍यात माझी नात तिथे आली, ""आजी, तू रडतेस का?''
""नाही गं, माझ्या शिक्षक जीवनातील आनंदाचा, समाधानाचा क्षण मी अनुभवते आहे.'' ही माझी नात लहान असताना आजी हे काय? याला काय म्हणतात? मला दाखव नाऽगं ! म्हणत आग्रह करायची, हट्ट करायची. तिच्याबरोबर बोलण्यात, तिला गोष्टी सांगण्यात, तिच्याबरोबर लहान बनून न कळत तिच्या शब्द भांडारात भर घालण्यात फार छान वेळ जात असे. नवीन शब्दांचा योग्य वापर ती चिमुकली करते. छान छान बोलते. लडिवाळपणाने कुशीत शिरते. सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करते. दुसऱ्यांना म्हणून दाखवते हे पाहून मला परमानंद होत असे. थोडी मोठी झाल्यावर "स्वाइन फ्लू' ही नाट्यछटा मी तिच्यासाठी लिहिली होती. तिला दुसरे बक्षीस मिळाले. मला कृतकृत्य वाटले. अजून काय पाहिजे. असे हे जीवनातील काही समाधानाचे क्षण !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com