पैशांवर निभावले!

muktapeeth
muktapeeth

गुन्हा नव्हता मनात तरी पोलिस समोर उभे पुन्हा. नंतरच्या नाट्यात, तुरुंगात जायच्याऐवजी पैशांवर निभावले.

आम्ही एका प्रवासी कंपनीबरोबर काश्‍मीर, वैष्णोदेवी, अमृतसर येथे सहलीला गेलो होतो. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून बाहेर पडता पडता मखमली निळ्या, केशरी, लाल रंगांच्या म्यानातील छोट्या तलवारी दिसल्या. मुलांना तलवारीचे आकर्षण असते. त्या पाहून नातवंडाकरिता तलवारी घेण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही. हॉटेलवर गेल्यावर खरेदी केलेल्या वस्तू सामानात ठेवल्या.

तीन ताल येथे बोटीतून जाताना एक दहा-बारा पदरी माळ, कानातले, छोटी कट्यार वगैरे गोष्टींची खरेदी झाली. आमचा प्रवास शेवटच्या टप्प्यात आला. सामान बांधून आम्ही गाडीत बसलो. प्रवासात एके ठिकाणी चहा पिण्यासाठी आम्ही उतरलो. शेजारीच बदाम, अक्रोड, राजमा, छोट्या कटारी होत्या. बऱ्याच जणांनी खरेदी केली व जवळच्या पिशव्यातून ठेऊन दिली.

रेल्वे स्थानकावर सामानासह उभे होतो. आमच्याकडच्या काही जणांच्या पिशव्यातून कट्यारी बाहेर डोकावत होत्या. त्या पाहून पोलिस जवळ आले. म्हणाले, "धारदार वस्तू बाळगण्यास मनाई आहे. चौकशीसाठी चला,' शेवटी सहलप्रमुखांनी ते प्रकरण कसेबसे मिटवले. आम्ही गाडीत बसलो. गाडीत आम्ही झोपायच्या तयारीत असताना पुन्हा पोलिस आले. "सोमण, कुलकर्णी, सावंत कुठे आहेत?' आम्हाला कळेना पोलिस पुन्हा का आले! "कट्यारी बाळगल्याबद्दल तुम्हाला पोलिस ठाण्यावर यावे लागेल. तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.' सगळेजण हादरून गेले. "अहो, आम्ही कुटुंबवत्सल माणसे आहोत. तुरुंगवास हे फारच होते आहे! आम्ही त्याचा कोणताच गैरवापर करणार नव्हतो. दसऱ्याच्या दिवशी हत्यारांची पूजा करतात, त्यासाठी घेतल्या आहेत.' "ठीक आहे. तुम्ही हातापाया पडता आहात. तुमच्यावर विश्‍वास ठेवतो. तुम्ही चांगली माणसे दिसता आहात. तरी दंड म्हणून पाच हजार रुपये द्या.' अखेर तीन हजार रुपयांच्या "दंडा'वर आम्हाला माफ करायला ते पोलिस कबूल झाले. जिवावर आले होते, पण पैशांवर निभावले असे समजून पैसे दिले. निश्‍वास सोडला. जीव भांड्यात पडला. कानाला खडा. पुन्हा प्रवासात खरेदी केलेल्या वस्तू व्यवस्थित लपवून ठेवायच्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com