'ऐ दिल है मुश्‍कील'बाबत मनसेची भूमिका कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - करण जोहर निर्मित "ऐ दिल है मुश्‍कील' चित्रपटाला विरोध कायम असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्पष्ट केले. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे पदाधिकारी आणि मनसे नेत्यांची बुधवारी बैठक झाली. यात पाकिस्तानी कलाकारांना असलेला विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मेट्रो सिनेमाजवळ निदर्शने करणाऱ्या 12 मनसे कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली.

करण जोहरने यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही; मात्र "ऐ दिल है मुश्‍कील' चित्रपटाला लक्ष्य करू नका, अशी विनंती काल (ता. 18) व्हिडीओद्वारे केली होती. ही विनंती मनसेने फेटाळून लावली, तसेच मेट्रो चित्रपटाच्या मालकांना हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असे आवाहन केले आहे. बुधवारी (ता. 19) दुपारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धोबीतलाव येथील मेट्रो सिनेमाजवळ निदर्शने केली. या वेळी 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठी चित्रपट महामंडळाचाही विरोध
इंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर असोसिएशन (इम्पा) व सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्‍झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनांनी पाकिस्तानी कलाकारांना यापुढे चित्रपटात काम करू न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पाठिंबा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होईपर्यंत पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध राहील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Web Title: ai dil hai mushkil movie oppose by mns