औरंगाबादचे वाघ जाणार मुंबईला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

अतिरिक्त संख्येमुळे सर्वसाधारण सभेत घेणार निर्णय 

औरंगाबाद - महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त वाघ झाल्यामुळे दोन वाघ मुंबई येथील प्राणिसंग्रहालयाला देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंगळवारी (ता. 27) महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले आहेत. सर्वसाधारण सभेत याबाबत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. 

देशभरात वाघांची घटती संख्या चिंतेचा विषय बनलेला असताना महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात मात्र आतापर्यंत 23 वाघ जन्मले आहेत. महापालिकेत वाघांची संख्या गेल्यावर्षी नऊ होती. एका वाघाचे निधन झाल्यामुळे ती आठवर आली. प्राणिसंग्रहालयाची उपलब्ध जागा पाहता आठच वाघ ठेवण्यास मंजुरी आहे. मात्र, सध्या 12 वाघ प्राणिसंग्रहालयात आहेत. काही महिन्यांपूर्वी समृद्धी या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिल्यानंतर ही संख्या वाढली आहे. सध्या हे बछडे पिंजऱ्यात असले तरी अतिरिक्‍त वाघ इतर प्राणिसंग्रहालयाला द्यावे लागणार आहेत. मुंबई आणि सोलापूर येथील प्राणिसंग्रहालयाकडून औरंगाबाद महापालिकेकडे दोन वाघांची मागणी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे केली आहे. त्यामुळे मुंबई प्राणिसंग्रहालयाला दोन वाघ देण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे महापौर असल्याने सोलापूरऐवजी मुंबईच्या प्रस्तावाला प्राधान्य दिले जात आहे. वाघांच्या बदल्यात औरंगाबाद प्राणिसंग्रहालयाला मुंबईतून काय मिळू शकते? याची पडताळणीदेखील केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 
 
सहाचे झाले तब्बल 23 
वर्ष 1985 मध्ये प्राणिसंग्रहालय सुरू झाल्यानंतर वर्ष 1995 मध्ये नंदनकानन अभयारण्यातून प्रमोद आणि भानुप्रिया ही पांढऱ्या वाघांची जोडी प्राणिसंग्रहालयात आणली होती. त्यानंतर वर्ष2005 मध्ये चंडीगड येथून देखील पिवळ्या वाघांच्या दोन जोड्या आणण्यात आल्या. त्यानंतर प्राणिसंग्रहालयात मागील 24 वर्षांत तब्बल 23 वाघ जन्मले. त्यातील अकरा वाघ इंदूर, मुंबई, पुणे, सतनाम, झारखंड आदी ठिकाणी देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad tiger to be sent to Mumbai