इनकॅमेरा उत्तरीय तपासणी, मुंबईतील सामूहिक बलात्कार प्रकरण

योगेश पायघन
रविवार, 1 सप्टेंबर 2019

मृत्यू नैसर्गिक? 
उत्तरीय तपासणीत काहीही आढळून आले नसून आजाराने पीडितेचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे; मात्र अनेक दिवस झाल्याने तिच्यावर अत्याचार झाला की नाही हे निश्‍चित सांगता येत नाही. दरम्यान, परिस्थितिजन्य पुराव्यावरून याबाबत तपास करता येऊ शकतो, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद - मुंबईतील चेंबूर येथे बलात्कार झालेल्या पीडितेचा बुधवारी (ता. 28) रात्री उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. तीन दिवसांपासून तिची उत्तरीय तपासणी पूर्ण होऊ शकली नव्हती. पोलिस आणि चळवळीच्या नेत्यांची समजूत घातल्यानंतर नातेवाइकांनी शवविच्छेदनाला सहमती दिली. शनिवारी (ता. 31) रात्री साडेआठच्या सुमारास इनकॅमेरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास तिच्यावर बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संशयितांना अटक होईपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका पालकांनी घेतल्याने तीन दिवसांपासून मृतदेह शीतगृहातच होता. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सुरेंद्र माळाळे, मधुकर सावंत, गोरख चव्हाण आदींसह पोलिसांचा ताफा शनिवारी दिवसभर "घाटी'त तळ ठोकून होता. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांना आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांनी समजावून सांगितले. पोलिसांनीही दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी होकार भरला. त्यानंतर शहरातील एका नातेवाइकाच्या घरून पोलिसांनी त्यांना चारच्या सुमारास घाटी रुग्णालयात शवविच्छेदनगृहात आणले. त्यानंतर रीतसर पंचांच्या समक्ष पंचनामा झाला. न्यायवैद्यक विभागप्रमुख डॉ. कैलास झिने यांच्यासह वरिष्ठ तज्ज्ञांच्या उपस्थितीत इनकॅमेरा शवविच्छेदन केले गेले. दरम्यान, घाटी पोलिस चौकीत आई-वडील बसलेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शवविच्छेदनगृहात भेट दिली. त्यानंतर पोलिसांना बंदोबस्ताच्या सूचना देत न्यायवैद्यकतज्ज्ञांशी चर्चा केली. रात्री साडेनऊच्या सुमारास उत्तरीय तपासणी संपली. त्यानंतर पीडितेवर पोलिस संरक्षणात बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
पोलिसांच्या आठ प्रश्‍नांना दिली उत्तरे 
मुंबई पोलिसांनी "घाटी'च्या डॉक्‍टरांकडून पीडितेच्या उपचारासंबंधित आठ प्रश्‍नांची लेखी उत्तरे मागितली होती. त्यापैकी वेळोवेळी औषधवैद्यक, स्त्रीरोग विभागाने केलेल्या निरीक्षणांच्या नोंदी मुंबईच्या पोलिस तपास पथकाला सुपूर्द करण्यात आल्या. त्यात तिच्या अंगावर कोणत्याही जखमा व व्रण आढळले नाहीत; तसेच घटना घडल्याचा कालावधी आणि घाटीत ऍडमिट होण्याच्या काळात मोठा काळ गेल्याने काही खुणा असतील तर त्या मिटण्याची शक्‍यता नाकारताही येत नाही; तसेच बराच कालावधी झाल्याने अत्याचारासंबंधी केलेल्या न्यायवैद्यक चाचण्यांतही काही आढळून येण्याची शक्‍यता धूसर असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Post-mortem in Mumbai gang rape case