esakal | डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकर!
sakal

बोलून बातमी शोधा

डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकर!

डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकर!

sakal_logo
By
अश्विनी भोसले

१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे!!
या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत?' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला!

अमेरिकेतील डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकरांची ही कहाणी. कानन शहा हिने ऑगस्ट मध्ये हा प्रश्न फेसबुक वरील DFW देसीज् या गटावर टाकला. ती स्वत: घाटकोपरची असल्यामुळे तिला येथील इतर मुंबईकरांना भेटण्याची इच्छा झाली आणि तिने फेसबुकचा आधार घेतला. काय आश्चर्य! येथील प्रवीण भोसलेला, जो भांडूपचा आहे, हाच प्रश्न पडला होता! झालं! आपला समविचारी त्याला मिळाला आणि कुतुहलापोटी त्याने Whats App वर ‘DFW तील मुंबईकर’ असा नवीन ऑनलाइन ग्रुप स्थापन केला.

तिथे हळूहळू मुंबईकर जमू लागले, नवनवीन कल्पना सुचू लागल्या. सगळ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उर्मी स्वस्थ बसू देईना. मग सगळ्यांनी जवळपासच्या उद्यानामध्ये भेटण्याचे ठरले. पण तोपर्यंत मुंबईकरांचे संख्याबळ शंभरापर्यंत गेले होते. एवढ्या सगळ्यांचा आवाज, लहान मुले अशा समस्या निर्माण झाल्या. मग कानन ने तिच्या घरी भेटण्याचे सर्वांना निमंत्रण दिले. जवळ जवळ 90 मुंबईकर जमले. प्रत्येकाने मुंबईची खासियत असलेले चाट पदार्थ आणले. नाच, गाणी आणि चमचमीत मेजवानी आणि बंबैया सहवास यांनी सगळे तृप्त झाले! निघतांना सगळ्यांचा एकच प्रश्न, 'आता परत कधी?'

या प्रतिसादाने उत्साहित होऊन प्रवीण आणि कानन यांनी नवरात्री-दिवाळीचा बेत आखला. दीडशे लोकांचा हॉलही आरक्षित केला. तोवर DFW तील मुंबईकर या ग्रुपचे सभासद दोनशेपुढे गेले. सभासदांची ही चढती भाजणी पाहून मग 300 लोकांचा फन एशिया हा रिचर्डसन येथील दुसरा हॉल घेतला. हळूहळू कार्यक्रमाला येणाऱ्या मुंबईकरांचा आकडा 270 च्या ही पुढे गेला. एकीकडे गरब्याची गाणी म्हणण्यासाठी, संगीत देण्यासाठी या गटातीलच मुंबईकर पुढे आले आणि त्यांच्या जोरदार तालमी सुरु झाल्या तर दुसरीकडे सजावट, अन्न पुरवठा, हिशेब, तिकीटविक्री या सर्व कामांसाठी स्वयंसेवक हिरीरीने पुढे आले आणि एक अनोखा कार्यक्रम आकार घेऊ लागला.

दरम्यान, या मुंबईकर गटाची आणि कार्यक्रमाची माहिती डॅलस मध्ये पसरू लागली. व्हॉट्स ऍप वर मुंबईतील आठवणींच्या चर्चा रंगू लागल्या. जणू डॅलस मध्ये एक मुंबईच नव्याने उभी राहू लागली. या गडबडीत 26 ऑक्टोबर, 2018 चा सुवर्णदिन उजाडला आणि मुंबईकरांसाठी डॅलसच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला गेला. संध्याकाळी 6 वाजल्यापासून डल्लासवासी मुंबईकर फन एशिया च्या हॉलवर सहकुटुंब जमू लागले. बरेच जण प्रथमच भेटत असल्यामुळे पुन्हा नाव गाव यांची उजळणी सुरु झाली. ऍप वर लिहिणाऱ्या मुंबईकराला चेहेरा मिळाला आणि अल्पावधीतच हे मुंबईतील मोठे कुटुंब मनाने जोडले गेले. ओळखी, गरब्याची गाणी, गरबा नृत्य, खाद्य पदार्थांची रेलचेल, DJ च्या संगीतावर थिरकणारी पावले आणि शेवटी मध्यरात्री जिलेबी फाफडा ची न्याहारी अशा एकापेक्षा एक सरस लडी उलगडत गेल्या आणि परदेशातील मायभूमीची झलक पाहायला मिळाली. मध्यरात्रीनंतर घरी जाताना प्रत्येकाच्या मनात मुंबईला आपल्या घरी दसरा-दिवाळी साजरी केल्याचा आनंद ओसंडत होता. साहजिकच प्रत्येक जण भारावून गेला होता.

आता यानंतर काय? आता हे मुंबईकर प्रकरण इतक्यावर थांबणारे नाही याची प्रत्येकाला खात्री पटली ती याच कार्यक्रमामुळे. किंबहुना ही तर सुरुवात आहे. मुंबईकरांचे खरे ब्रीद फक्त धमाल करणे नाही तर एकमेकांना सांभाळून घेणे, धर्म, भाषा यांच्या पल्याड जाऊन गुण्यागोविंदाने एकत्र राहणे आणि मदतीला तत्परतेने धावणे ह्यात आहे हे सगळे ओळखून आहेत. म्हणूनच येथे नवीन आलेल्या मुंबईकराला या ऍप वरील ग्रुपद्वारे डॉक्टरांपासून cleaning lady पर्यंत, बम्बैय्या  खाद्यपदार्थ कुठे चांगले मिळतील इथपासून स्वयंसेवक कसे आणि कुठे हवे आहेत याची माहिती मिळते आहे. जवळपास राहणारे मुंबईकर एकत्र येऊन चित्रपट पाहायला किंवा, फिरायला आणि शेरोशायरी करायला जमत आहेत. काही मुंबईतले शेजारी तर काही एका शाळेचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी 20-30 वर्षांनी पुन्हा एकत्र आले या ग्रुपमुळे! चित्रपटांतील "भुले बिसरे" मुंबईकर आज डॅलस मध्ये पुन्हा एका परिवारात सामील झाले आहेत.

आणि म्हणूनच आता पुन्हा काय या प्रश्नाला उत्तर म्हणून वर्षअखेरीच्या कार्यक्रमाची आखणी सुरु झाली आहे. मुंबईकरांच्या प्रचंड उत्साहामुळे हा ही कार्यक्रम तसाच उत्तुंग होईल ह्यात शंका नाही. शेवटी आपल्या मुंबईचे गाणे आहेच ना...

बम्बईसे आया मेरा दोस्त
दोस्त को सलाम करो
रात को खाओ पिओ
दिन को आराम करो....