Video 26/11 : हुतात्मा ओंबळेंचे स्मारक "लालफितीत'च

संदीप गाडवे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

केडंब्यात 11 वर्षांनंतरही तुकाराम ओंबळेंचे स्मारक उभारले नसल्याने शासन व प्रशासनाची असंवेदनशीलता स्पष्ट हाेत आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

केळघर (जि. सातारा) : मुंबईवरील 26-11-2008 च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून देवून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या केडंबे (ता. जावळी) गावचे सुपुत्र हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी उभारण्याबाबत शासन व प्रशासन या दोघांचीही असंवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येताना दिसत आहे.
 
मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग होता. पाकिस्तानचा या दहशतवादी हल्ल्यातील सहभाग जगापुढे आणण्यासाठी हुतात्मा ओंबळे यांनी आपल्या जिवाची परवा न करता दहशतवादी अजमल कसाबला केवळ लाठीच्या साह्याने पकडले होते. मात्र, अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्मा ओंबळेंच्या स्मारकाची फरफट गेल्या 11 वर्षांपासून सुरू आहे. हुतात्मा ओंबळेंच्या बलिदानाला पुढच्या वर्षी 12 वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण होईल, तरीही या स्मारकाचे काम संथतीने सुरू असल्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. 

11 वर्षांनंतरही स्मारक नाहीच

हुतात्मा ओंबळे यांच्या जन्मगावी केडंबे येथे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली होती. स्मारकासाठी ग्रामपंचायतीने जागाही उपलब्ध करून दिली आहे. राज्य सरकारने स्मारकासाठी दोन कोटी रुपये निधीही मंजूर केला आहे. मात्र, पुढे स्मारकाचे काम नेमके का अडले, याचे कोडे असूनही उलगडत नाही. मात्र, 11 वर्षांनंतरही स्मारकाचा पत्ता नसल्याने सरकारच्या वेळकाढूपणाबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या तर सरकारकडून स्मारकाबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याने हुतात्म्यांच्या बलिदानाचा सरकारला विसर पडला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

ओंबळेंचा यथोचित गौरव व्हावा

हुतात्मा ओंबळे यांचे भव्य स्मारक केडंबे येथे झाल्यास त्यांच्या बलिदानाचा खऱ्या अर्थाने सन्मान केल्यासारखेच होईल. तसेच त्यांचे स्मारक युवकांना देशसेवेची कायम प्रेरणा देवून कायमस्वरूपी वारसा म्हणून ठरणार असून, शासनाने तातडीने ओंबळेंच्या स्मारकाचा प्रश्न सोडवून त्यांच्या बलिदानाचा यथोचित गौरव करण्याची आवश्‍यकता आहे. 

""हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकासाठी ग्रामस्थांनी दिलेली जमीन देवस्थानची आहे. ही जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांतर्फे शासनाकडे पाठवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर जागा झाल्यावर स्मारकाच्या कामाला सुरवात होईल. बांधकाम विभागाने बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. स्मारक रखडले आहे, ही वस्तुस्थिती असली तरी स्मारकाचे 
काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'' 
शरद पाटील, तहसीलदार, जावळी. 

""देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचा सातासमुद्रापार असणाऱ्या अमेरिकेच्या संसदेतही गौरव होतो. मात्र, त्यांच्या जन्मभूमीत त्यांचे यथोचित स्मारक होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. हुतात्मा ओंबळे यांचे अतुलनीय कार्य युवा पिढीसाठी आदर्श म्हणून ठरण्यासाठी स्मारक होणे गरजेचे होते. मात्र, शासन व प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.'' 
 एकनाथ ओंबळे, सदस्य, जिल्हा नियोजन समिती व हुतात्मा ओंबळे यांचे चुलत बंधू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Memorial Of The Martyr's Tukaram Omble Neglected Even After 11 Years By State Government