मुसळधार पावसाचे रायगड जिल्ह्यात सहा बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

अलिबाग : मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात सहा जणांचे बळी घेतले. अलिबाग तालुक्‍यातील चौल येथून बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरु आहे. रविवारी दुपारपर्यंत नद्यांना आलेले पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले असून या पुरातील नुकसानीची भयानकता पुढे येत आहे. संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत मदत पोहचत असून मुसळधार पावसाने विस्कळित झालेले जनजीवन सुरळीत होत आहे. आर्थिक नुकसानीचा निश्‍चित आकडा मंगळवारपर्यंत समोर येईल.
कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांचा जोर ओसरला आहे. या नद्या इशारा पातळीपेक्षा सुरक्षित पातळीवर वाहत आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे सहाय्यक पूरनियंत्रण अधिकारी एन. डी. पाटील यांनी कळवली आहे. किनारी भागातीलही पाणी कमी होत आहे. यामुळे संपर्क तुटलेल्या पेण तालुक्‍यातील गावांपर्यंत मदत पोहचविण्यात आली आहे. रविवारची सुट्टी असतानाही महसूलचे अधिकारी पंचनामे करण्यात गुंतले आहेत.

अलिबाग-वडखळ महामार्ग सहा तास बंद
मुसळधार पावसाने अलिबाग-वडखळ महामार्गावर भलेमोठे वडाचे झाड पडल्याने सहा तास वाहतुक खंडित झाली होती. रविवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान झाड दूर करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी दोन तास उशिराने दाखल झाले, त्यामुळे झाड बाजुला करण्यास दुपारचे दोन वाजून गेले होते. तोपर्यंत या महामार्गावरील वाहतुक बंद होती.

दहिगाव येथुन युवक वाहुन गेला
शनिवार (ता.27) रोजी कर्जत तालुक्‍यातील दहिगाव येथील 19 वर्षीय युवक बंटी बबन भालेराव हा दहिगाव इंजिवली ओहळामधुन पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला होता. रविवारी सकाळी मृतदेह सापडला आहे.

चौल येथील युवकाचा शोध सुरुच
अलिबाग तालुक्‍यातील चौल येथील यश म्हात्रे हा युवक मित्रांसोबत खाडीमध्ये मासे पकडण्यासाठी गेला असता वाहून गेला आहे. जीवरक्षक, स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध कार्य सुरु आहे.

कुडपण येथील मृतदेह बाहेर काढण्यात यश
पोलादपूर तालुक्‍यातील कुडपण येथे एक युवक ओहोळमध्ये वाहून गेला होता. स्थानिक प्रशासन, पोलिस विभागाचे कर्मचारी, सिस्का ट्रेकर्स ग्रुप व कर्तव्य प्रतिष्ठान, महाबळेश्‍वर ट्रेकर्स ग्रुप, यंग ब्लड ऍडव्हेचरर्स ग्रुप, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह रात्री उशिरा पाण्यातून बाहेर काढला आहे.

पनवेलमध्ये नाल्यात पडुन तरुणाचा मृत्यू
पनवेल मधील उसरली येथे चेतन यशवंत मोरे (वय 30) या तरुणाचा नाल्यामध्ये बुडून मृत्यु झाला आहे. तो मुळचा अलिबाग तालुक्‍यातील फणसवाडी येथील राहणारा असून मृतदेह सापडला आहे.

नागोठणे येथे तलावात पडुन वृद्धाचा मृत्यु
नागोठणे येथील तलावामध्ये परशुराम विचारे (वय 70) यांचा बुडून मृत्यु झाला आहे. तोल गेल्याने ते तलावातील पाण्यात पडले होते, त्यांना बाहेर काढीपर्यंत ते मरण पावले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: आर्थिक नुकसानीचे पंचनामे सुरू; अलिबाग-वडखळ महामार्ग सहा तास बंद