माणगाव बाजारपेठेत ‘कडकनाथ’ कडाडला!

अजित शेडगे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

माणगाव: रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या माणगावमध्ये सध्या कडकनाथ कोंबड्यांची चलती आहे. एरवी ब्रॉयलर, गावठी कोंबड्याच या बाजारात दिसत होत्या. आता काळ्या आणि तुर्रेबाज कडकनाथाचे दर्शन होत आहे. स्वादिष्ट आणि सकस आहार म्हणून ग्राहकही अधिक पैसे मोजून हे मांस खरेदी करीत आहेत. गेल्या सहा महिन्यांत त्याची तब्बल ५० टक्‍क्‍यांनी मागणी वाढली आहे. सध्या तिचा भाव प्रति किलो ६०० रुपये भाव आहे.

माणगाव अस्सल खवय्यांचे गाव आहे. शेवळासारख्या रानभाज्यांपासून फणसाच्या बियांपर्यंतची महागडी भाजी या गावाच्या बाजारात हमखास मिळते. शाकाहाराप्रमाणेच मांसाहारींची संख्याही येथे मोठी असल्याने ब्रॉयलर, गावठी कोंबडी ते लाहोरीपर्यंतचे मांस या ठिकाणी मिळते. गोड्या चिंबोऱ्या, गोड्या पाण्यातले मासेही मिळण्याचे हे हमखास हे ठिकाण आहे. आता या बाजारात आणखी एका वेगळ्या प्रकाराची भर पडली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य बाजारांत मिळणारे ‘कडकनाथ’चे ते मांस आहे. 

शरीराची झीज भरून काढणारी आणि अधिक लोह देणारी कोंबडी म्हणून ही जात असल्याचे सांगण्यात येते. कमी मेद आणि कॅल्शियमचे अधिक प्रमाण असल्याचेही सांगण्यात येते.  जवळ आलेला श्रावणातील उपवास व गटारीपूर्वी कडकनाथ कोंबडीची माणगावात चांगली आवक झाली असून ६०० रुपये प्रति किलो दराने या कोंबडीचे मांस उपलब्ध आहे. 

माणगावकरांची कडकनाथला पसंती मिळत आहे. यापूर्वी तिची चव माणगावसाठी दुरापास्त होती. महाग असल्याने सर्वसामान्य तिचे मांस विकत घेत नव्हते. सहा महिन्यांत तिची मागणी ५० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. सध्या तिचा भाव ६०० रुपये प्रति किलो आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

अशी आहे कडकनाथ 
कडकनाथ जातीची कोंबडी झारखंडमध्ये झाम्बुवा जिल्ह्यातील आहे.  अधिक प्रोटीन असलेल्या या कोंबडीचे मांस आणि अंड्यांना मोठी मागणी आहे.

कडकनाथला गटारीच्या दिवसांत  मागणी वाढणार आहे. महाड आणि पुणे या ठिकाणांहून या कोंबड्या आणतो. मोजकेच व्यावसायिक उत्पादन घेत असल्याने भाव अधिक आहे. 
- सुधीर तेडगुरे, व्यापारी, माणगाव

कडकनाथचे मांस खूप चवदार असते. महाग असले तरी नक्कीच आवडते. 
- परशुराम गावित, ग्राहक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: गोड्या चिंबोऱ्या, गोड्या पाण्यातले मासेही मिळण्याचे हे हमखास हे ठिकाण माणगाव आहे. आता या बाजारात आणखी एका वेगळ्या प्रकाराची भर पडली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य बाजारांत मिळणारे ‘कडकनाथ’चे ते मांस आहे.