नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यात बुडून तरुणीचा मृत्यू

गजानन चव्हाण 
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

शनिवार सकाळी नवी मुंबईतील नेरूळच्या एसआयईएस महाविद्यालयातील तरुण तरुणी पावसाचा आनंद घेण्यासाठी आले होते. त्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुण डोंगरातून धमोळा पाडा येणाऱ्या ओढ्यात वाहून गेले.

नवी मुंबई : खारघरमधील गोल्फ कोर्सलगत असलेल्या डोंगरावर पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले सात पर्यटक ओढ्यात वाहून गेले. एका तरुणीचा मृतदेह हाती लागला. तीन तरुणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. तीन तरुणींचा शोध अग्निशमन दल जवान आणि खारघर पोलिस घेत आहेत. 

पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी असल्याने मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील पर्यटक परिवारासह खारघर सेक्टर सहा गोल्फ कोर्स शेजारी असलेल्या डोंगरातून झिरपणाऱ्या पावसाच्या धारेत तर काही जवळच असलेल्या ओढ्यात पावसाचा आनंद घेतात. विशेषतः डोंगरलगत  सिडकोने ड्रायव्हिंग रेंज उभारले आहे. तिथेच रस्त्यावर वाहने उभी करून पर्यटक पावसाचा आनंद घेतात. शनिवार सकाळी नवी मुंबईतील नेरूळच्या एसआयईएस महाविद्यालयातील तरुण तरुणी पावसाचा आनंद घेण्यासाठी आले होते. त्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तरुण डोंगरातून धमोळा पाडा येणाऱ्या ओढ्यात वाहून गेले. त्यात नेहा जैस्वाल हिचा मृतदेह हाती लागला असून तीन तरुणांची सुटका अग्निशमन जवान आणि खारघर पोलिसांनी केली आहे. तिघींचा शोध सुरू असल्याचे  खारघरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 girl died in pandavkada waterfall in kharghar navi mumbai