उल्हासनगरात बाप्पाच्या विसर्जनाला 10 फुट उंचीच्या बंदीचा फतवा

दिनेश गोगी
रविवार, 26 ऑगस्ट 2018

बाप्पाच्या आगमनाला जेमतेम पंधरा दिवस राहिले असून गणेशोत्सव मंडळांनी तीनचार महिन्यापूर्वीच मूर्ती बुक केल्या असतानाच,10 फुटाच्या मूर्तींना विसर्जनाच्या बंदीचा फतवा उल्हासनगर महानगरपालिकेने काढला आहे. याबाबत शिवसेनेने पालिकेला जाब विचारला असून विसर्जनासाठी खाडीचा मार्ग सुकर करून देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

उल्हासनगर- बाप्पाच्या आगमनाला जेमतेम पंधरा दिवस राहिले असून गणेशोत्सव मंडळांनी तीनचार महिन्यापूर्वीच मूर्ती बुक केल्या असतानाच,10 फुटाच्या मूर्तींना विसर्जनाच्या बंदीचा फतवा उल्हासनगर महानगरपालिकेने काढला आहे. याबाबत शिवसेनेने पालिकेला जाब विचारला असून विसर्जनासाठी खाडीचा मार्ग सुकर करून देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

23 तारखेला पालिका आयुक्त गणेश पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस, कल्याणजी घेटे, पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत, जनसंपर्क अधिकारी विनोद केणे यांची गणेशोत्सवाच्या रूपरेषा विषयी बैठक झाली. त्यात गणेशोत्सव मंडळांनी पीओपी ऐवजी शाडू च्या गणपती मूर्ती घ्याव्यात. हिराली फाऊंडेशन,मेरा फाऊंडेशन येथे ह्या मूर्ती उपलब्ध आहेत. उल्हासनगरात सेंच्युरी रेयॉन बोटक्लब, आयडीआय कंपणी जवळ, हिराघाट बोटक्लब, उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील कृत्रीम तलाव व कैलास कॉलनी अशा पाच ठिकाणी गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली.

या पाचही ठिकाणांवर 10 फुटाच्या हाईटच्या मूर्तीला विसर्जनाची बंदी घालण्यात आली आहे. तसे प्रसिद्धी पत्रक पालिकेच्या वतीने जनसंपर्क अधिकारी विनोद केणे यांनी जारी केले आहे. 10 फुटाच्या हाईटच्या मूर्तीला विसर्जनास बंदी घालण्यात आल्याचा प्रकार समजताच शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. गणेशोत्सव मंडळे तीनचार महिन्यापूर्वीच मोठ्या मुर्त्या पेण-पनवेल आदी शहरातून बुक करतात. त्या पूर्णतः तयार झालेल्या असाव्यात. तत्पूर्वीच, पालिकेने सर्व मंडळांची बैठक घेऊन त्यांना याबाबत, अवगत करणे गरजेचे होते. पालिका मनात येईल तेंव्हा कायदा नियम करणार काय? असा सवाल उपस्थित करून मोठ्या मूर्त्यांना कल्याणकर त्यांच्या हद्दीतील खाडीत विसर्जन करू देण्यास नकार देतात. आता शहरात जर बंदी करत असाल तर कल्याणच्या खाडीचा मार्ग पालिका व पोलिसांनी मिळून सुकर करून घ्यावा.अशी मागणी चौधरी यांनी पाटील यांच्याकडे केली.

पोलीस उपायुक्त मनोज शेवाळे यांची देखील शिवसेना भेट घेणार असल्याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले आहे.

Web Title: 10 feet height ban on Bappa immersion in Ulhasanagar