मुंबई : पाणीकपात रद्द; तलावांत 51 टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

मुंबईत मागील वर्षी तलावांच्या क्षेत्रात परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे प्रशासनाने 15 नोव्हेंबरपासून 10 टक्के पाणीकपात लागू केली होती.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले आहे. सध्या तलावांत 51 टक्के म्हणजे 203 दिवस पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द केल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. 19) स्थायी समितीच्या बैठकीत जाहीर केला. दरम्यान, मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे. 

मुंबईत मागील वर्षी तलावांच्या क्षेत्रात परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे प्रशासनाने 15 नोव्हेंबरपासून 10 टक्के पाणीकपात लागू केली होती. यंदा जुलैच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस झाला; तसेच सध्या तलावांच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने 203 दिवस पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. तुळशी तलाव 12 जुलैला ओसंडून वाहू लागला; अन्य सहा तलावांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची अपेक्षा असल्यामुळे मुंबईत लागू केलेली 10 टक्के पाणीकपात मागे घेतल्याचे निवेदन अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी शुक्रवारी स्थायी समिती बैठकीत केले. 

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी तलावांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या तलावांत 7 लाख 43 हजार 531 दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. आणखी दीड महिना पाऊस पडू शकतो. या काळात समाधानकारक पाऊस झाल्यास तलावांत वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा होऊ शकतो. तसे झाले नाही, तर पुन्हा पाणीकपातीचे संकट मुंबईकरांवर येण्याची शक्‍यता वर्तवली जाते. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

तलावांची स्थिती : उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष लिटर) 

वैतरणा 22,756 
मोडक सागर 1,06,124 
तानसा 1,15,456 
विहार 16,122 
तुळशी 8,046 
भातसा 3,37,521 
मध्य वैतरणा 1,37,506 
एकूण 7,43,531

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 percent water cutting in Mumbai canceled 51 percent water stock in ponds