
आता 7 ते 13 डिसेंबरदरम्यान पाणी कपात
मुंबई : पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेने मुंबईत 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत जाहीर केलेली 10 टक्के पाणी कपात आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही पाणी कपात आता 7 ते 13 डिसेंबर या दरम्यान होणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबईत मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. पाणीकपातीमुळे अनुयायींचे हाल झाले असते. त्यामुळे पाणी कपात मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅट्रिक गेट सिस्टीमची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे पाणी कपात पालिकेने जाहीर केली होती. मात्र, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईत येतात. त्यामुळे या कालावधीत पाणी कपात केल्यास पाणीटंचाई निर्माण होऊन अनुयायांची गैरसोय होऊ शकते; त्यामुळे जाहीर केलेली पाणी कपात पुढे ढकलावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने पालिका आयुक्तांकडे केली होती.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ही पाणीकपात पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन पालिकेने ही पाणी कपात पुढे ढकलली आहे.