कोस्टल रोडसाठी एक हजार कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये रस्ते विभागासाठी यंदाही सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंतच्या कोस्टल रोडसह संपूर्ण रस्ते विभागासाठी तब्बल तीन हजार 286 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोस्टल रोडसाठी 15 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; तर दोन ठिकाणी भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.

नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंतच्या 29 किलोमीटरच्या कोस्टल रोडसाठी एक हजार कोटी रुपयांची सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या नरिमन पॉइंट ते वरळी या 9.98 किलोमीटरच्या रस्त्यासाठी पात्रता विनंती अर्ज मागविण्यात आले आहेत. निवड या महिन्याअखेरपर्यंत होईल असा दावा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. तसेच प्रकल्प व्यवस्थापन, सल्लागार नेमणुकीसाठी निविदा मागविण्यात आल्या असून सल्लागाराची नियुक्ती पुढील महिन्यापर्यंत करण्यात येणार आहे. हे काम पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 15 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे; तर मुलुंड, गोरेगाव या प्रस्तावित भुयारी जोड रस्त्यासाठी 130 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील वाहनतळांची अपुरी संख्या, त्यामुळे रस्त्यांवर उभी राहणारी वाहने यासाठी खार येथील पटवर्धन पार्क आणि भायखळा येथील मदनपुरामध्ये भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे आराखडे तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सध्याच्या 92 वाहनतळांची संख्या 275 पर्यंत नेण्यात येणार आहे.

पादचाऱ्यांसाठीचे पदपथ धोरण
पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित जागा देण्यासाठी पादचारी प्राधान्य पदपथ धोरण राबविण्यात येणार आहे. या धोरणात पदपथ, पदपथावरील अतिक्रमणे हटविण्यावर भर देण्यात येणार आहे; तर पदपथांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. खास करून पदपथावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात येणार आहे. तसेच पदपथांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे.

रस्त्यांसाठीच्या तरतुदी...
प्रारूप विकास आराखड्याच्या शिफारशीनुसार रस्तेरुंदीकरणासाठी 30 कोटी
15 किलोमीटरच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 400 कोटी
125 किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 582 कोटी
69 चौकांचे मजबुतीकरण करणार
विक्रोळी रेल्वे स्थानक येथील वाहतूक पुलासाठी 255.19 कोटी

Web Title: 1000 caror for costal road