सुधागडमध्ये मोबाईल सेवा आऊट ऑफ कव्‍हरेज? वाचा नेमकं काय झालं!

 पाली : मोबाईल टॉवरला सील लावतांना महसूल कर्मचारी. (छायाचित्र, अमित गवळे)
पाली : मोबाईल टॉवरला सील लावतांना महसूल कर्मचारी. (छायाचित्र, अमित गवळे)

पाली : सुधागड तालुक्‍यातील एकूण 11 मोबाईल कंपन्यांचे टॉवर महसूल प्रशासनाने शनिवारी (ता. 1) व सोमवारी (ता. 3) सील केले आहेत. तालुक्‍यातील प्रत्येक मोबाईल टॉवर कंपनीकडे 51 हजार 950 म्हणजे एकूणच 5 लाख 71 हजार 450 रुपयांची थकबाकी असल्याने महसूल प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सुधागड तालुक्‍यातील अनेक गावांमधील मोबाईल सेवा खंडित होणार आहे.

मोबाईल टॉवर कंपन्यांकडून महसूल कराची रक्कम भरण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे सुधागड तालुक्‍यातील एकूण 11 मोबाईल टॉवर कंपन्यांना महसूल कार्यालयाकडून काही महिन्यांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. परंतु नोटीस दिल्यानंतरही संबंधित मोबाईल टॉवर कंपन्यांकडून कर न मिळाल्याने सुधागड-पाली महसूल विभागाकडून तालुक्‍यातील सर्वंच मोबाईल टॉवर कंपन्यांवर कार्यवाही करण्याचे सत्र सुरू केले आहे. 

सुधागड तालुक्‍यात 109 गावे आहेत. बहुतांश गावे डोंगर, कड्याकपाऱ्यांत वसली आहेत. महसूल विभागाकडून मोबाईल टॉवर कंपन्यावर केलेल्या कारवाईमुळे अनेक गावातील नेटवर्क खंडित झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांचा संपर्क तुटल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत हिंगणे यांनी सांगितले.

येथे झाली कारवाई 
पाली तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील एकूण 11 मोबाईल टॉवरवर कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये रिलायन्स मोबाईल टॉवर (पाली), इसार वोडाफोन मोबाईल टॉवर (पाली), आयडिया मोबाईल टॉवर (पाली), टाटा इंडीकॉम मोबाईल टॉवर (पाली), विजन मोबाईल टॉवर (पाली), एअरटेल मोबाईल टॉवर (पाली), इसार वोडाफोन मोबाईल टॉवर (झाप), टाटा इंडिकॉम टॉवर (पाली), इसार वोडाफोन मोबाईल टॉवर (उन्हेरे), जांभूळपाड आणि पेडली येथील मोबाईल टॉवर कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये मोबाईल कंपनीच्या टॉवरना सील करण्यात आले आहे. 

मोबाईल कंपन्या सरकारचा महसूल बुडवत आहेत. कर जमा करण्याची नोटीस देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी सरकारचा कर जमा वेळीच करावा. 
- दिलीप रायण्णावार, तहसीलदार, सुधागड-पाली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com