मुंबईतून 12 लाखांची रोकड जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

देशात सध्या निवडणुकीमुळे वातावरण तापले असताना मुंबईतील शिवडी परिसरातून 12 लाख रुपयांची संशयित रोकड पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून याबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली आहे. 

मुंबई - देशात सध्या निवडणुकीमुळे वातावरण तापले असताना मुंबईतील शिवडी परिसरातून 12 लाख रुपयांची संशयित रोकड पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून याबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली आहे. 

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात नाकाबंदी लावण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.5) पहाटे तीनच्या सुमारास पोलिस निरीक्षक चंदनशिवे व त्यांच्या पथकाने पांढऱ्या रंगाच्या संशयित कारची तपासणी केली. कारमध्ये जुबेर समिउल्ला खान (वय 24), सय्यद शनबाज मोहम्मद शहा आलम (वय 25), युसुफ उस्मान शेख (वय 30) आणि अकबर सलीम पठाण (वय 31) हे चौघेजण होते. त्यांपैकी जुबेर समिउल्ला खानकडील बॅगेत काय असल्याचे विचारले असता त्याने बॅगेत पैसे असल्याचे सांगितले. मात्र, रकमेबाबत विचारल्यानंतर समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांना चौकशीसाठी शिवडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता त्यांच्याकडे 12 लाख एक हजार 500 रुपये रोख आढळून आले. अधिक चौकशी केली असता ही रक्कम व्यवसायासाठी आणल्याचे सांगितले. मात्र, ती रक्कम कुठून आणली, याबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला कळविले असून प्राप्तिकर विभागाचे उपायुक्त चौकशी करीत आहेत. 

Web Title: 12 lakh cash seized from Mumbai