बेघरांसाठी पुढील वर्षांपर्यंत 12 लाख घरे 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 मे 2018

राज्यपालांचा मनोदय; 25 रोजगार देणार 

मुंबई- कर्जमाफीपासून दूर असलेल्या सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे 25 हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढील वर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी 12 लाख घरे बांधण्याचा मनोदय व्यक्त करत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी उद्याच्या विकसित महाराष्ट्राचे वर्णन केले. शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. 

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे. मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार आणि विहिरी खोदणे यांसारख्या योजना राबवून सरकार राज्यभरातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. या वर्षात सरकारने 2.26 लाख हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण करण्याचे आणि पाण्याच्या साठवण क्षमतेत 853 दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढ करण्याचे निश्‍चित केले आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 55 लाखांपेक्षा अधिक खातेधारक शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी देण्यात आली आहे. 

स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून आतापर्यंत महाराष्ट्रात 60 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. राज्यातील 34 जिल्हे, 351 तालुके, 27,667 ग्रामपंचायती आणि 40 हजार 500 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. प्लास्टिकपासून पर्यावरणाला असणारा धोका लक्षात घेऊन, राज्य सरकारने राज्यामध्ये प्लास्टिक व थर्मोकोलपासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची निर्मिती, विक्री व वापर यांवर नियमन करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरणाचे व नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण होण्यास मदत होईल. या मोहिमेत मनापासून सामील होण्याचे आवाहनही राज्यपालांनी या वेळी केले. 

Web Title: 12 lakh houses for the homeless next year