इंजेक्‍शनची बाधा झाल्याने  12 महिला अत्यवस्थ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

  • अंबरनाथच्या छाया रुग्णालयातील प्रकार 
  • आरोग्य विभागाने संबंधित इंजेक्‍शनचा वापर थांबवण्याचे आदेश

अंबरनाथ : इंजेक्‍शनमुळे 12 रुग्णांना बाधा होऊन त्यांची प्रकृती ढासळल्याची घटना अंबरनाथ येथील डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (ता. 3) घडली. सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोग्य विभागाने संबंधित इंजेक्‍शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. 

सोमवारी (ता. 2) रात्री साडेनऊच्या दरम्यान थंडी आणि तापावर उपचारासाठी छाया रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून "सेफ्ट्रीयाझोन' नावाचे इंजेक्‍शन देण्यात आले. त्यानंतर काही वेळातच रुग्णांना मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलटीचा त्रास होऊ लागल्याने खळबळ उडाली. रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त करत कालबाह्य इंजेक्‍शन दिल्याचा आरोप केला. याबाबत माहिती मिळताच छाया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत दोडे यांनी रुग्णालयात धाव घेत बाधा झालेल्या सर्व बारा रुग्णांना उल्हासनगरच्या शासकीय आणि काहींना खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सर्व रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. दोडे यांनी सांगितले. शीतल दोंदे, नेहा गुप्ते, खुशबू मुरुगन, जानकी भगत, मेहबुबी शेख, मंजू मुबानदा, रमा चिंदे, सानिया भट, कोमल पस्ते, रिजवाना बागवान, दिपू गौड, दुर्गा भगत असे बाधित महिलांचे नाव आहे. 

इंजेक्‍शनचा वापर थांबवला 
रुग्णांना दिलेल्या इंजेक्‍शनचे उत्पादन जून 2019 मधील असून अंतिम मुदत मे 2021 असल्याचे डॉ. दोडे म्हणाले. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने इंजेक्‍शनचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. आरोग्य विभागानेही संबंधित इंजेक्‍शनचा वापर थांबवून उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिले. 

फोटो 
इंजेक्‍शनमुळे बाधा झालेल्या रुग्णांची उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात चौकशी करताना आमदार डॉ. बालाजी किणीकर, उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, डॉ. तडवी आदी. (छायाचित्र ः श्रीकांत खाडे) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 women became ill due to obstruction of injection