पालिका शाळांत मानधनावर 132 पदे भरणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नवी मुंबई - महापालिकेच्या शाळांत अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा लवकरच शिक्षण विभागातर्फे भरल्या जाणार आहेत. शिक्षकांची ही 132 पदे ठोक मानधनावर भरली जाणार आहेत. त्यासाठी 16 मे 2018 पर्यंत अखेरची मुदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागांतील या भरतीमुळे अनेक वर्षांपासूनचे शिक्षक भरतीचे ग्रहण सुटणार आहे. 

नवी मुंबई - महापालिकेच्या शाळांत अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा लवकरच शिक्षण विभागातर्फे भरल्या जाणार आहेत. शिक्षकांची ही 132 पदे ठोक मानधनावर भरली जाणार आहेत. त्यासाठी 16 मे 2018 पर्यंत अखेरची मुदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागांतील या भरतीमुळे अनेक वर्षांपासूनचे शिक्षक भरतीचे ग्रहण सुटणार आहे. 

महापालिकेच्या 42 शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागात तब्बल 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; मात्र पालिकेकडे विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुरेसे शिक्षक नसल्याने एका शिक्षकाला दोन वर्गांवर शिकवावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांवर वाढणाऱ्या कामाच्या ताणामुळे शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्‍यता वर्तवली जात असल्याने अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची मागणी करण्यात येत होती. अखेर महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी या शिक्षक भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी 12 वी पास डीटीएड अधिक टीईटी परीक्षा उत्तीर्ण, सहावी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी बीए, बी.एस्सी. अधिक बी.एड., टीईटी परीक्षा उत्तीर्ण अर्हता ठेवण्यात आली आहे. खुल्या गटातील 38 वर्षे व मागासवर्गीय गटातील 43 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येणार असून 20 हजार ठोक मानधनावर नियुक्त करण्यात येणार आहे. इच्छुक अर्जदारांना महापालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी 16 मे 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

132 पदांची वर्गवारी 
लवकरच शिक्षण विभागातर्फे ठोक मानधन तत्त्वावर शिक्षकांची 132 पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात येणार आहे. प्राथमिक विभागात मराठी- 20, हिंदी- 39, उर्दू- 7; तर माध्यमिक विभागात मराठी- 20, हिंदी- 39, उर्दू- 7 अशी ही पदे भरली जाणार आहेत. 

निवडीसाठी कार्यपद्धती 
पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी बारावी उत्तीर्ण डीटीएड अधिक टीईटी अशी शैक्षणिक अर्हता ठरवण्यात आली आहे; मात्र आवश्‍यक पदांपेक्षा टीईटी अर्हताधारक उमेदवारांचे अर्ज जास्त आल्यास टीईटी गुणांच्या मेरिटनुसार निवड करण्यात येणार आहे. तसेच टीईटी अर्हताधारक पात्र उमेदवारांचे आवश्‍यक पदांपेक्षा कमी अर्ज आल्यास उर्वरित पदांवर डीटीएडच्या मेरिट गुणांनुसार निवड केली जाणार आहे. सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठीही याचप्रमाणे नियमावली ठरवण्यात आली आहे. 

Web Title: 132 posts to be filled in municipal schools