14 कोटींच्या विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नवी मुंबई -  महापालिकेकडून सर्वाधिक कामे ए. के. इलेक्‍ट्रिकल्सला देण्यात येत असून, त्यांची कामे असमाधानकारक आहेत. त्यामुळे त्यांची कंत्राटे रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली. दरम्यान, स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत शहरातील 14 कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली. 

नवी मुंबई -  महापालिकेकडून सर्वाधिक कामे ए. के. इलेक्‍ट्रिकल्सला देण्यात येत असून, त्यांची कामे असमाधानकारक आहेत. त्यामुळे त्यांची कंत्राटे रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली. दरम्यान, स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत शहरातील 14 कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली. 

वाशी येथील सेक्‍टर 9, 9 ए, 10, 10 ए, 15, 16, 16 ए येथील जलउदंचन केंद्र चालविणे व देखभाल करण्याच्या कामाची मुदत आणखी नऊ महिने वाढवून देण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला होता. इलेक्‍ट्रिकल्सची कामे असमाधानकारक असल्यामुळे त्या कंत्राटदाराला मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी मढवी यांनी सभागृहात केली. इलेक्‍ट्रिकल्सच्या बेजबाबदार कामांमुळे नागरिकांना व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुविधा मिळत नसल्याने अनेकदा गैरसोयींना सामोरे जावे लागते, असा आरोप मढवी यांनी केला; तर कंत्राटदारांकडून कामगारांना वेळेवर पगार दिला जात नसल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी पाटील यांनी सभागृहात केली. मात्र महापालिकेकडून कंत्राटदाराला कामगारांच्या हिशेबाने ठेका दिला नसून, त्यानेच कामगाराचे पगार द्यायचे आहेत, असे उत्तर शहर अभियंता मोहन डगावकर यांनी सभागृहात दिले. तसेच ए.के इलेक्‍ट्रिकल्स यांच्या कामाबाबत अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी त्रस्त झाले असून असमाधानकारक कामामुळेच त्यांचे सध्याचे काम थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती डगावकर यांनी सभागृहात दिली. 

या वेळी घणसोली, कोपरखैरणे, वाशी गाव, सानपाडा या ठिकाणी मलनिःसारण वाहिनी टाकणे, सर्जिकल साहित्य खरेदी करणे, वाशी जलउदंचन केंद्राची देखभाल व चालवणे यासहित ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढीव खर्चाला सुधारित मान्यता देणे अशा कामांसह एकूण 14 कोटींना स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळाली.  
 

बॅनरबाजांवर गुन्हे दाखल करू! 
शहरात राजकीय बॅनरबाजी करून शहर विद्रूप करणाऱ्यांवर कारवाई करताना महापालिका पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी पाटील यांनी स्थायी समितीमध्ये केली; मात्र महापालिका बॅनरबाजांवर कारवाई करताना पक्षपातीपणा करत नसून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करीत आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली. तसेच विनापरवानगी बॅनरबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असे संकेत चव्हाण यांनी दिले. 

Web Title: 14 crore development works approvalStanding Committee for