
Mumbai : लवकरच त्या 14 गावांचा विषय मुख्यमंत्री शिंदे मार्गी लावणार; सर्व पक्षिय विकास समितीची माहिती
डोंबिवली - नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करावित या साठी सर्व पक्षीय विकास समिती पाठपुरावा करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना मार्च 2022 मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा केली.
त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये ही गावे पालिकेत समाविष्ट करण्याविषयी अधिसूचना निघाली. अधिवेशनातील घोषणा ते अधिसूचना निघण्याचा कालावधी हा पाच ते सहा महिन्यांचा होता आता अधिसूचना निघून दहा महिने उलटले आहेत पण अंतिम अधिसूचना निघाली नाही.
यामुळे 14 गावांचे घोंगडे भिजत पडले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची नुकतीच समितीने भेट घेतली असून आठवड्या भरात बैठक बोलावून आदेश काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना दिले आहे. येत्या महिन्यात हा विषय मार्गी लागतो की निवडणूकी पर्यंत तो लांबविला जातो हे आता पहावे लागेल.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश व्हावा यासाठी गेले अनेक वर्षे 14 गाव सर्व पक्षिय विकास समिती लढा देत आहे. विकास समिती सोबतच मनसेचे कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील हे देखील गावांच्या विकासासाठी या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा करीत होते.
2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार पाटील यांनी याविषयी मुद्दा उपस्थित केल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री शिंदे यांनी गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याविषयी घोषणा केली होती. घोषणा झाली परंतू त्याविषयी पुढे काहीच हालचाली होत नव्हत्या.
समिती सदस्य सातत्याने सर्व पक्षातील वरिष्ठांची भेट घेत होते, मात्र त्यांना आश्वासनां पलीकडे काही हाती लागत नव्हते. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे व फडणवीस यांचे सरकार आले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि समितीच्या आशा पल्लवित झाल्या.
त्यातच आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आश्वासनांची पूर्तता करा अशी मागणी केली होती. त्यानंतर लगेचच सप्टेंबर 2022 मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना निघाली.
त्यावर हरकती देखील मागविण्यात आल्या होत्या. याला आता दहा महिन्यांचा कालावधी उलटला असून त्यावर पुढे काहीच हालचाली होताना दिसत नाही. निवडणूका ही पुढे ढकलल्या जात असल्याने 14 गावांचे घोंगडे देखील सरकारने भिजत ठेवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवा येथे विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. खिडकाळेश्वर मंदिर येथे मुख्यमंत्री शिंदे यांची विकास समितीने भेट घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, पंचायत समिती सदस्य भरत भोईर व गुरुनाथ पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना 14 गावांची अधिसूचना काढण्याविषयीचे स्मरणपत्र दिले. यावर आठवड्याभरात बैठक बोलावून आदेश देण्यात येतील असे आश्वासन समिती सदस्यांना दिले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणूकांसाठी गावांतून काही उमेदवार हे इच्छुक आहेत. निवडणूकांपूर्वी गावांचा पालिकेत समावेश व्हावा यासाठी समिती जोरदार प्रयत्न करत आहे. मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रीया सुरु करण्याचे आदेश दिले होते.
गावांचा पालिकेत समावेश झाला नसल्याने ही गावे पालिका निवडणूक प्रक्रिया पासून देखील वंचित आहेत. निवडणूकांपूर्वी गावांचा निकाल लागावा अशी आशा प्रत्येकालाच आहे. मात्र सरकार आत्ताच याचा निर्णय घेते की पालिका निवडणूकांच्या तोंडावर गावांचा पालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला जातो हे पहावे लागेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्ही सातत्याने भेट घेत आहोत. 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याविषयी अधिसूचना निघाली आहे. याला आता पाच सात महिन्यांचा काळ निघून गेला आहे.
परंतू यात अंतिम जीआर यायचा असून गावे समाविष्ट होणे बाकी आहे. खिडकाळेश्वर मंदिर येथे मुख्यमंत्री शिंदे हे आले असता आम्ही त्यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी स्वतः आमच्या कामांची विचारपूस केली असता आम्ही 14 गावांचा जीआरचा प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यांनी येत्या आठवड्यात बैठक बोलावून आदेश काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
- लक्ष्मण पाटील, अध्यक्ष, 14 गाव सर्व पक्षिय विकास समिती