१५ नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार : अशोक गावडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी भाजपात जाण्यास विरोध केला आहे. तसेच लवकरच ते निष्ठावान नगरसेवकांना एकत्र करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादीच्या १५ निष्ठावान नगरसेवकांनी नकार दर्शवला आहे. संपूर्ण नाईक कुटुंब भाजपमध्ये गेले तरी चालेल; पण अखेरपर्यंत किल्ला लढवू, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी भाजपात जाण्यास विरोध केला आहे. तसेच लवकरच ते निष्ठावान नगरसेवकांना एकत्र करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबई शहरात भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकारण तापले आहे. माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक व माजी खासदार संजीव नाईक हे सर्व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या; परंतु या नेत्यांच्या आधी आपणच भाजपमध्ये जाऊ, अशी भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५७ नगरसेवकांनी चक्क बैठकच घेतली होती. या बैठकीला निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवकांनी हजेरी लावून भाजपमध्ये जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अशोक गावडे, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, डॉ. जयाजी नाथ, शंकर शिंदे, नगरसेविका शुभांगी पाटील, शोभा पाटील, अशोक पाटील आदी नगरसेवकांकडून भाजप प्रवेशाबाबत नकारार्थी संकेत मिळाल्याची चर्चा राष्ट्रवादीत सुरू आहे. 

मंगळवारी (ता.३०) व्हाईट हाऊसवर संपन्न झालेल्या बैठकीतही काही नगरसेवकांनी आवर्जून कारणे देऊन अनुपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गैरहजेरीतून ते पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या जो-तो भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरे काहीच बोलण्यासच तयार नसल्याने राष्ट्रवादीत राहणार तरी कोण? असा प्रश्‍न निष्ठावान कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र राष्ट्रवादीतील १५ नगरसेवकांनी आपण आहोत त्या ठिकाणीच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोणालाही कुठे जायचे असेल तर खुशाल जाऊ शकतात; मात्र आम्ही अखेरपर्यंत नवी मुंबईचा किल्ला लढवू. माझ्यासारखे काही निष्ठावान नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार आहेत. लवकरच मी पक्षाध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहे.
- अशोक गावडे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 Councilors will remain in nationalist: Ashok Gawade