विमा पॉलिसीच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे लागले आहेत. तुमची विमा पॉलिसी बंद असून ती सुरू ठेवायची असेल, तर ऑनलाईन रक्कम भरणा करा असे सांगत भामट्यांनी फसवणूक केली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात चार भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 

ठाणे : ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्यास आयुर्विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले एक लाख परत मिळवण्यासाठी तब्बल 17 लाख 14 हजार गमवावे लागले आहेत. तुमची विमा पॉलिसी बंद असून ती सुरू ठेवायची असेल, तर ऑनलाईन रक्कम भरणा करा असे सांगत भामट्यांनी फसवणूक केली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात चार भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाण्यातील चरई परिसरात राहणारे शैलेश वालिया यांचा मोबाईल कव्हर विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी व त्यांच्या पत्नीने आयडीबीआय बॅंकेत भेटलेल्या तेजस दळवी याच्यामार्फत 2016 मध्ये फेडरल लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या 50 हजार वार्षिक हप्त्याच्या दोन पॉलिसी काढल्या; मात्र या पॉलिसीमध्ये फायदा नसल्याने याचा दुसरा हप्ता न भरता पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, 6 जून ते 12 जुलै 2018 या कालावधीत जनार्दन रेड्डी, विशाल राणावत, आदित्य नायर आणि राहुल सिंग नामक भामट्यांनी वालिया दाम्पत्याला फोन करून तुमची पॉलिसी बंद पडली असून, ती सुरू ठेवायची असेल आणि त्याचे फायदे मिळवायचे असेल, तर आम्ही सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन रक्कम भरावी लागेल असे सांगितले. पैसे नाही भरले तर तुमची पॉलिसी आणि भरलेले पैसे ब्लॉक केले जातील, अशी धमकीदेखील या भामट्यांनी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या दाम्पत्याने भामट्यांनी फोनवरून सांगितल्यानुसार पीएफटी सोल्युशन आणि एफडीआर सर्व्हिसेस या दोन कंपन्यांच्या खात्यात वेळोवेळी ऑनलाईन तब्बल 17 लाख 14 हजार 728 रुपये भरले; मात्र त्यानंतर पॉलिसी बंद पडली नसल्याचे कळल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यानंतर वालिया यांच्या पत्नी रेखा यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
 

Web Title: 17 lakh fraud in the name of insurance policy