खड्ड्यांच्या 1700 तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सहायक आयुक्तांचा खिसा रिकामा होणार 

मुंबई ः मुंबईच्या रस्त्यांतील खड्ड्यांची पालिकेच्या ऍपवर तक्रार करा आणि 500 रुपयांचे बक्षीस मिळवा, अशी बक्षीस योजना पालिकेने जाहीर केल्यानंतर खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. 24 तासांत खड्डा न बुजवल्यास 500 रुपये बक्षीस योजनेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या ऍपवर तब्बल सुमारे 1700 तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यातील सुमारे 1200 खड्डे बुजविण्यात यश आले असून उर्वरित 500 खड्ड्यांचे प्रत्येकी पाचशे रुपये संबंधित सहायक आयुक्तांना द्यावे लागणार आहेत.

पाऊस थांबायचे नाव घेत नाही. पावसाने रस्त्याची चाळण झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. तब्बल 80 कोटी रुपयांचे कंत्राट दिले. तरीही मुंबईतील रस्ते खड्ड्यातच आहेत. खड्डे बुजविण्याचे कोल्डमिक्‍स हे तंत्रज्ञान फेल ठरले आहे. कोल्डमिक्‍स ऐवजी हॉटमिक्‍स तंत्राचा वापर करा, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती.

मात्र कोल्डमिक्‍सचा आग्रह प्रशासनाने धरला. भेसळयुक्त साहित्याचा वापर केल्याने खड्डे बुजले नाहीतच, पण ते वाढले आहेत. त्याचा नागरिकांना तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पेव्हर ब्लॉकवर बंदी असूनही पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्यात आले. नोव्हेंबर उजाडला तरी खड्डे बुजत नसल्याने मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

आयुक्‍तांचा रामबाण उपाय 
पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या समस्येवर रामबाण उपाय शोधला आहे. कोणतेही नवे तंत्रज्ञान न वापरता त्यांनी नामी युक्ती अवलंबली आहे. मोठ्या आकाराच्या खड्ड्यांची तक्रार करा आणि तक्रारीनंतर 24 तासांमध्ये ते न बुजल्यास 500 रुपयांचे बक्षीस देण्याची योजना त्यांनी जाहीर केली. त्यावरून स्थायी समितीत तीव्र पडसाद उमटले. बक्षिसाची ही रक्कम संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांच्या खिशातून दिली जाणार असून करदात्यांच्या खिशातून जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1700 complaints of pits