वीरेश्वर तलावाच्या संवर्धनासाठी पावणे दाेन कोटीचा निधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

महाड शहरातील वीरेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी राज्य सरकारने १ कोटी ७५ लाख रुपयांच्या संवर्धन प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

महाड : महाड शहरातील वीरेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी राज्य सरकारने १ कोटी ७५ लाख रुपयांच्या संवर्धन प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या योजनेतून वीरेश्वर तलावाचे सौंदर्यीकरण करून जैविक प्रक्रियेद्वारे तलावातील पाण्याच्या गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत.

राज्यातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी २००६-०७ पासून सरोवर संवर्धन योजना सुरू केली आहे. या योजनेतून नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या वीरेश्वर तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, साचलेला घातक व ऑरगॅनिक गाळ काढणे, तलावाची गुणवत्ता टिकविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यानंतर उत्सव कालावधीत निर्माल्य वा मूर्तीचे विसर्जन वा तत्सम बाबींमुळे तलावातील पाण्यात प्रदूषण होणार नाही, याची दक्षता महाड नगरपालिकेला घ्यावी लागणार आहे.

वीरेश्वर तलावाचे संवर्धन करण्याचा प्रस्ताव महाड नगरपालिकेने सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. हा प्रस्ताव सुकाणू समितीच्या  बैठकीत मंजुरीसाठी आला होता. त्‍यात १ कोटी ७५ लाख एकूण मंजूर निधीपैकी ७० टक्के हिस्सा राज्य सरकारचा; तर ३० टक्के हिस्सा अंमलबजावणी संस्थेचा असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1.75 lakhs for beautification of Vireshwar lake