स्वतंत्र बेस्ट मार्गिकेला 19 कोटींची संजीवनी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - बीकेसीतील बेस्टची बस वाहतूक वेगवान होण्यासाठी एमएमआरडीएच्या स्वतंत्र मार्गिकेचा प्रयोग फसला. वेगळ्या सायकल ट्रॅकचा प्रयत्नही मार्गी लागलेला नाही; तरीही आता बेस्ट बसच्या स्वतंत्र मार्गिकेला संजीवनी देण्यासाठी एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी तब्बल 19 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबई - बीकेसीतील बेस्टची बस वाहतूक वेगवान होण्यासाठी एमएमआरडीएच्या स्वतंत्र मार्गिकेचा प्रयोग फसला. वेगळ्या सायकल ट्रॅकचा प्रयत्नही मार्गी लागलेला नाही; तरीही आता बेस्ट बसच्या स्वतंत्र मार्गिकेला संजीवनी देण्यासाठी एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी तब्बल 19 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबईतील पायाभूत प्रकल्पांसाठी बीकेसी जणू एक प्रयोगशाळाच. ज्या मार्गिकेवर सध्या बेस्ट बस धावतात तिथे पाच वर्षांपूर्वी एमएमआरडीएने सायकल ट्रॅक बांधला. तब्बल साडेसहा कोटींचा खर्च करून एमएमआरडीएने बीकेसीतील "जी' ब्लॉकमध्ये 13 किलोमीटरचा ट्रॅक बांधला. एमएमआरडीएतील एका आयएएस अधिकाऱ्याची सायकल ट्रॅकची आयडिया महागात पडली; पण कत्रांटदारांचे भले झाले. "वर्क टू होम' संकल्पना आणण्यासाठी सायकल ट्रॅक बांधण्यात आला; पण रहिवासी संकुलांच्या तुलनेत सरकारी व कॉर्पोरेट कार्यालये अधिक असलेल्या बीकेसीत सायकल कोण चालवणार, असा प्रश्‍न कोणालाही पडला नाही. अखेर सायकल ट्रॅकचा वापरच खुंटला. आता तर तो बंदच करण्यात आला आहे. त्या जागेचा पुन्हा नव्याने वापर करण्यासाठी एमएमआरडीएने यंदाच्या जूनपासून तेथे बेस्ट बसची स्वतंत्र मार्गिका तयार केली. मात्र, काही महिन्यांतच तो प्रयोग फसला. आता नव्याने निविदा काढत 19 कोटींचा खर्च मार्गिकेसाठी केला जाणार आहे.

रिक्षाचालकांची घुसखोरी
बेस्टच्या स्वतंत्र मार्गिकेमध्ये इतर वाहनांची घुसखोरी टाळण्यासाठी एमएमआरडीएने वॉर्डनची नियुक्ती केली; पण मोटरसायकलस्वार आणि रिक्षाचालकांच्या अरेरावीपुढे वॉर्डनचे काही चालेनासे झाल्याने त्यांच्यावरील खर्चही वाया गेला. वाहतूक पोलिसांच्या गैरहजेरीमुळेही वाहनचालकांचे फावले. मुळात पेव्हर ब्लॉकवरून बेस्टच्या बस धावत असल्याने त्यांचा वेग वाढण्याऐवजी मंदावला. आता नव्या निविदेमध्ये बेस्टचा स्वतंत्र मार्गाच्या कॉंक्रीटीकरणावर भर दिला गेला आहे.

भारतनगरमधील डेडिकेटेड लेन "डेड'
वांद्रे-कुर्ला संकुलात अनेक ठिकाणी डेडिकेटेड लेनमध्ये येणारे अडथळे बेस्ट बसचालक आणि प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. अनेक ठिकाणी बेकायदा पार्किंग, पदपथालगतच्या पेव्हर ब्लॉकचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, मॅनहोल चेंबरची दुरवस्था, वळणाचे रस्ते आदी बिकट अवस्थेत हा प्रकल्प आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाहनांनी, बेकायदा दुकानचालकांनी आणि रिक्षा-टॅक्‍सीवाल्यांनी डेडिकेटेड लेनचे प्लास्टिक दुभाजकाचे खांब उखडून टाकले आहेत. अशीच अवस्था वांद्रे-कुर्ला संकुलात अनेक ठिकाणी आहे. परिणामी बेस्ट बस डेडिकेटेड लेन "डेड' झाल्यात जमा आहे. एकूणच डेडिकेटेड लेनमुळे संपूर्ण रस्त्याचा काही भाग कमी झाल्याने अनेक ठिकाणी वाहनकोंडीही होत आहे. डेडिकेटेड लेनचा चुकीचा वापर होत असल्याने उलट्या दिशेनेही वाहने हाकली जात आहेत. भारतनगर परिसरात महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) कंपनीचे गॅस भरणा केंद्र आहे. खासगी वाहनांपासून रिक्षा-टॅक्‍सींनी बेस्ट उपक्रमाच्या डेडिकेटेड लेनमध्ये घुसखोरी करण्याचा प्रकार आता रोजचाच झालेला आहे. गॅस भरणा केंद्रापर्यंत सतत वाहनांची रांग असल्याने बेस्ट बसना लेनचा वापरच करता येत नाही. ऍपवर आधारित टॅक्‍सी सेवांच्या गाड्यांचे बेकायदा पार्किंगही बेस्ट लेनमध्ये भारतनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. बीकेसी परिसरात चालणाऱ्या रिक्षांचीही त्यात मोठी भर पडत आहे. परिणामी भारतनगर परिसरात संपूर्ण डेडिकेटेड लेनमध्ये वाहतूक कोडी होत आहे.

फॅमिली कोर्ट परिसरात "बेकायदा' अडथळे
फॅमिली कोर्ट परिसरात बेकायदा उभारण्यात आलेले खानपानाचे स्टॉल, शेअरिंग रिक्षांची गर्दी आणि पार्किंगसाठी वाहनांची वणवण याचा फटका डेडिकेटेड लेनला बसला आहे. फॅमिली कोर्ट परिसरातील सर्व प्लास्टिक दुभाजकाचे पोल उखडून टाकण्याचा प्रतापही करण्यात आला आहे. इथेही डेडिकेटेड लेनचा उद्देश मोडीत निघाला आहे. फॅमिली कोर्ट परिसरात बेस्टच्या डेडिकेटेड लेनच्या बाहेरील बाजूस रिक्षा प्रवासी भाड्यासाठी तळ ठोकून असतात. रिक्षाचालकांची मुजोरी बिनदिक्कत सुरू आहे.

उशिरा सुचलेले शहाणपण
झाडाच्या फांद्यांची योग्य छाटणी न झाल्याचा फटका बेस्टला काही दिवसांपूर्वी बसला. बेस्टच्या डबल डेकर बसला अपघात होऊन सहा प्रवासी जखमी झाले होते. उशिरा का होईना; पण आता सावधगिरीचा उपाय म्हणून बीकेसीमध्ये अखेर फाद्यांची छाटणी सुरू झाली आहे.

बेस्टसाठी एमटीएनएल ते कुर्लादरम्यान मिळालेल्या डेडिकेटेड लेनमुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. एरवी पीक अवरमध्ये बीकेसी परिसरात बेस्ट बसना 40 ते 42 मिनिटे लागायची. आता अवघ्या 20 ते 22 मिनिटांमध्ये प्रवास पूर्ण होत आहे. बेकायदा पार्किंग, रस्त्यांची दुरवस्था आणि अडथळ्यांबाबत वेळोवेळी एमएमआरडीएला कळवले आहे. एमएमआरडीएनेही या समस्या सोडवण्यासाठी मदत केली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची डागडुजी आणि लेन मोकळी करून देण्यासाठी एमएमआरडीए मदत करत आहे.
- व्हिक्‍टर नागावकर (विशेष कार्यकारी अधिकारी, बेस्ट उपक्रम)

Web Title: 19 crore fund for Independent BEST route