मुंबईत 196 बोगस पीएसआय; नापास झाल्यानंतरही प्रमोशन

अनिल कांबळे
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

- मुंबई पोलिस दलात 196 बोगस पीएसआय 
- नापास झाल्यानंतरही प्रमोशन
- कोट्यवधीचा गैरव्यवहार बाहेर येण्याची शक्‍यता 

नागपूर- हायटेक आणि फास्ट तपासासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिस दलात तब्बल 196 बोगस पोलिस उपनिरीक्षकांची (पीएसआय) भरती करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत हे सर्व नापास झाले होते. मात्र त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चिरिमिरी देऊन निकाल बदलल्याचे कळते. यात कोट्यवधीची दोवाणघेवाण झाल्याची खमंग चर्चा पोलिस वर्तुळात आहे. 

राज्यात 2013मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पोलिस उपनिरीक्षक पदाची खैरात वाटण्यात आली होती. "सकाळ'ने वृत्तमालिका प्रकशित करताच पोलिस महासंचालक कार्यालयात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, आस्थापनाचे के. के. सारंगल आणि राजकुमार व्हटकर यांनी गांभीर्य दाखवून अर्हता परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांची महासंचालक कार्यालयात पेशी केली होती. त्यावर चौकशी सध्या सुरू आहे. अशाच प्रकारे मुंबई शहर पोलिस दलात अर्हता परीक्षेत नापास झाल्यामुळे पीएसआय पदासाठी पात्र नसलेल्या उमेदवारांनी महासंचालक कार्यालयातील काही लिपिक आणि पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी "अर्थपूर्ण' बोलणी केल्यानंतर चक्‍क नापास झालेल्या उमेदवारांना पीएसआय पद बहाल करण्यात आले. एकट्या मुंबईत तब्बल 196 बोगस पीएसआय आहेत. हाच प्रकार मुंबईशिवाय राज्यभरातही झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पैसे घेऊन पोलिस अधिकारी बनविल्याचा आरोप अनेक हवालदारांनी केला आहे. 

बोगस अधिकाऱ्यांना प्रमोशन 
2013 च्या अर्हता परीक्षेत नापास झालेल्यांना केवळ पीएसआय पद देऊनच थांबले नाहीत तर काही लोकांना सहायक पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीसुद्धा देण्यात आली. त्यामुळे कुणी अन्यायग्रस्त पोलिस उपनिरीक्षक "मॅट'मध्ये गेल्यास पोलिस महासंचालकांसह अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

कमी गुण तरीही अधिकारी 
2013 ला पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत तीन पेपर घेण्यात आले होते. प्रत्येक पेपरमध्ये 50 गुण पास होण्यासाठी, तर एकूण 150 गुण मिळविणे अनिवार्य होते. मात्र एका पेपरमध्ये 18 गुण आणि एकूण 110 गुण असल्यामुळे नापास झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पोलिस उपनिरीक्षक बनविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे जे मेहनतीने पास झाले त्यांच्यावर सपशेल अन्याय झाला. 

मुख्यमंत्र्यांनी घ्यावी दखल 
अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या यादीत बदल करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्राथमदर्शनी समोर येत आहे. नापास उमेदवारांकडून पैसे घेऊन पोलिस अधिकारी बनविण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास 13 हजार पोलिस हवालदारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी दखल घेऊन या प्रकरणात लक्ष्य घालावे, अशी मागणी पोलिस कर्मचाऱ्यांची आहे. 

Web Title: 196 bogus psi in Mumbai police