मुंबई परिसरात पावसाचे 19 बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मुंबई - पावसाने मंगळवारी (ता. 29) दिलेल्या तडाख्यात मुंबई-ठाणे परिसरात 19 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत. मुंबई शहर उपनगरांत 11, ठाण्यात तीन, तर पालघरमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला. बेपत्ता व्यक्तींचाशोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये बॉम्बे हॉस्पिटलमधील एका प्रसिद्ध डॉक्‍टर दीपक अमरापूरकर यांचाही समावेश आहे.

मंगळवारी झालेल्या पावसामुळे घाटकोपर येथील असल्फा व्हिलेजमधील एका घरावर सबस्टेशनची भिंत कोसळून रामेश्‍वर तिवारी (वय 45) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचा मुलगा क्रिश (वय 9) आणि पत्नी मंजू (वय 35) जखमी झाल्या. विक्रोळीतील सूर्यनगर येथे टेकडीला भाग दोन घरांवर कोसळून तिघांचा मृत्यू झाला. विक्रोळीतीलच वर्षानगर परिसरातील जनकल्याण सोसायटीत घराची भिंत कोसळून कल्याणी जंगम या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेत तिचे आई-वडील जखमी झाले आहेत. मढ जेटीवर गणेश विसर्जनासाठी केलेल्या रोहितकुमार चिन्नू शहा (वय 17, रा. अंधेरी) हा तरुण बुडाला, तर पाय घसरून पवई तलावात पडून दिलीपकुमार झा (वय 32) याचा मृत्यू झाला.

सायन येथील गांधी मार्केट परिसरात उभ्या असलेल्या मोटारीत प्रियेन नावाच्या 30 वर्षांच्या वकिलाचा मृतदेह आढळला. श्‍वास गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरात वेगवेगळ्या घटनांत चार जण वाहून गेले. त्यात अंधेरी एमआयडीसी परिसरात नाल्यात वाहून जाणाऱ्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रवाहात ओढल्या गेलेल्या एका तरुणाचाही समावेश आहे.

ठाणे परिसरातही पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर पालघर जिल्ह्यात पूल-साकव ओलांडण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा मृत्यू झाला.

मृतांची संख्या
11 - मुंबई शहर उपनगरे
05 - पालघर
03 - ठाणे

आता आव्हान रोगराईचे
पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे बुधवारी मुंबई परिसरातील व्यवहार अवघ्या 24 तासांतच पूर्वपदावर आले खरे; पण आज जागोजागी साचलेले पाणी-कचरा, तुडुंब भरलेल्या नाल्यांतून रस्त्यावर आलेले सांडपाणी, पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्याने जागोजागी निर्माण झालेली डबकी, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेले उंदीर-घुशींसारख्या उपद्रवी जीवांचे मृतदेह, त्यामुळे रोगराई पसरण्यास निर्माण झालेल्या पोषक परिस्थितीचा सामना करण्याचे आव्हान सरकारी यंत्रणांसमोर आहे.

Web Title: 19th death in mumbai rain