नवी मुंबई पोलिस दलात २ अत्याधुनिक वाहने दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

लेझर तंत्रज्ञानयुक्त बंदुका, ई-चलन यंत्रणा, मद्यपींवरील कारवाईसाठी यंत्रणा यांसारखी आधुनिक तांत्रिक उपकरणे असलेली दोन अत्याधुनिक वाहने नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी वाशी टोल नाका येथे पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते या अत्याधुनिक वाहनांचे उद्‌घाटन करण्यात आले.

नवी मुंबई : लेझर तंत्रज्ञानयुक्त बंदुका, ई-चलन यंत्रणा, मद्यपींवरील कारवाईसाठी यंत्रणा यांसारखी आधुनिक तांत्रिक उपकरणे असलेली दोन अत्याधुनिक वाहने नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी वाशी टोल नाका येथे पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते या अत्याधुनिक वाहनांचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सुनील लोखंडे, सहायक पोलिस आयुक्त अरुण पाटील व वाहतूक शाखेतील इतर पोलिस अधिकारी, कार्मचारी उपस्थित होते.

या वाहनांमुळे बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे सोयीचे होईल. त्याद्वारे महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा बसेल, असा विश्‍वास पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी या वेळी व्यक्त केला. रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यातील बहुतेक अपघात हे वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे होत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्‍वूमीवर बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी दोन अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यात आली आहेत. 

राजधानी दिल्लीत उपयुक्तता सिद्ध
दिल्लीत या अत्याधुनिक वाहनांचा वापर करण्यात येत असून, या वाहनांमुळे त्या भागातील अपघात कमी करण्यात स्थानिक पोलिसांना बऱ्यापैकी यश आले आहे. हे पाहता महाराष्ट्र पोलिसांनीदेखील आपल्या ताफ्यात ९६ अत्याधुनिक वाहने खरेदी केली आहेत. यातील दोन वाहनेही नुकतीच नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली.

ही वाहने दोन्ही परिमंडळांत कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. या वाहनांवर काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले असून, येत्या सोमवारपासून या वाहनांच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.
- संजय कुमार, पोलिस आयुक्त, नवी मुंबई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 sophisticated vehicles in navi mumbai police force