फुप्फुसाच्या कर्करुग्णांमध्ये 20 टक्के वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नवी मुंबई -हवाप्रदूषण आणि धूम्रपानामुळे पाच वर्षांपासून फुप्फुसाच्या कर्करुग्णांच्या संख्येत 20 टक्के वाढ झाली असल्याचे चेस्ट रिसर्च फाऊंडेशनने म्हटले आहे. 

नवी मुंबई -हवाप्रदूषण आणि धूम्रपानामुळे पाच वर्षांपासून फुप्फुसाच्या कर्करुग्णांच्या संख्येत 20 टक्के वाढ झाली असल्याचे चेस्ट रिसर्च फाऊंडेशनने म्हटले आहे. 

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्टडी ऑफ लंघ कॅन्सर या संस्थेमार्फत नोव्हेंबरमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती केली जाते. वाहनांमधून निघणारा धूर हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे श्‍वसन आणि टीबीसारखे आजार होत असल्याचे आजवर ऐकले होते; परंतु यामुळे स्तनांचा कर्करोग होत असल्याचे अमेरिकेतील "द सायलेन्ट स्पिंग इन्स्टिट्यूट'च्या संशोधनात आढळले आहे. जगातील सर्व देशांमध्ये फुप्फुसाच्या कर्करुग्णाचा आकडा दर वर्षी वाढत आहे. यामुळे दर वर्षी जागतिक स्तरावर 16 लाख लोकांचा मृत्यू होतो. 2015 मध्ये भारतात एक लाख दहा हजार नागरिक या कर्करोगाचे बळी ठरले आहेत. 2009 मध्ये 65 हजार, तर 2013 मध्ये 90 हजार जणांचा बळी गेला होता. यामुळे याचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांनी वाढत असल्याचे स्पष्ट होते. 

डिझेलच्या धुरामुळे फुप्फुसाचा कर्करोग होतो, असा निष्कर्ष गेल्या वर्षी 12 जूनला जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोगविषयक अभ्यास विभागाने काढला होता. त्यामुळे वाहन प्रदूषण टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस "बस डे', "सायकल डे', "वॉकिंग डे' पाळले पाहिजेत. यामुळे प्रदूषण कमी होईल; शिवाय इंधनाचीही बचत होईल, असे वोक्‍हार्टचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी यांनी सांगितले. हवा प्रदूषणाने दर वर्षी 30 लाख जणांचा अकाली मृत्यू होतो. हवा प्रदूषणाची ही पातळी वाढत गेली तर 2050 पर्यंत प्रदूषणाच्या बळींचा आकडा 66 लाखांवर जाईल, अशी भीती जर्नल नेचर या ब्रिटिश नियतकालिकाने अहवालात व्यक्त केली आहे. 

इंधन, फटाके, कारखाने आणि वाहनांतून निघणारा धूर, धूळ, विडी व सिगारेटचा धूर, शेतीत वापरली जाणारी रासायनिक खते, प्राण्यांच्या मलमूत्रातून तयार होणार अमोनिया यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते. त्याचा पहिला फटका श्‍वसन संस्थेला बसतो. यामुळे फुप्फुसाचा कर्करोग, हृदयरोग होतो. 
- डॉ. उमा डांगी, व्होक्‍हार्ट रुग्णालय 

Web Title: 20 percent increase in lung cancer patients