
Mumbai Fire: ओशिवरा परिसरात फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत 20 ते 25 दुकानं जळून खाक
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पश्चिम जवळील ओशिवरा घास कम्पाऊंडयेथील फर्निचर गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून फायर कूलिंगचे काम चालू आहे. आग आटोक्यात आली असली तरी या घटनेत 20 ते 25 फर्निचरची दुकाने जळून खाक झाली आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ओशिवरा घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला आज सकाळी अकराच्या सुमारास भीषण आग लागली. लाकूड गोदाम आणि फर्निचरचे शॉप असल्यामुळे क्षणातच आगीने वेग पकडला. सुदैवाने ही आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळजवळ दीड तास शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

जोगेश्वरीतील ओशिवरा येथे फर्निचरची मोठी बाजारपेठ आहे. या आगीत सकाळच्या दरम्यान लाकूड गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 12 ते 14 गाड्यां घटनास्थळी पोहोचले. तब्बल दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
मुख्य रस्त्यालगत ही घटना घडल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी आता एस व्ही रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे. या ठिकाणी असणारे दुकानदार या भीषण आगीपासून आपल्या दुकानातील माल वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसुन आले.