दोनशे विवाह मंडळांची आठ महिन्यांत नोंदणी

- हर्षदा परब
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - विवाह मंडळांची नोंदणी करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याने दिल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदणी प्रक्रिया सुरू केली. आठ महिन्यांत 200 विवाह मंडळांनी नोंदणी केली असली तरी मुंबईतील नेमका आकडा किती, याबाबत पालिका अधिकाऱ्यांना कल्पना नाही.

मुंबई - विवाह मंडळांची नोंदणी करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याने दिल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदणी प्रक्रिया सुरू केली. आठ महिन्यांत 200 विवाह मंडळांनी नोंदणी केली असली तरी मुंबईतील नेमका आकडा किती, याबाबत पालिका अधिकाऱ्यांना कल्पना नाही.

एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेने जाहिरात देऊन विवाह मंडळांना नोंदणीचे आदेश दिले होते. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत मुंबईत 200 विवाह मंडळांची नोंदणी झाली असून मुंबईत किती विवाह मंडळे आहेत याबाबत पालिका अधिकाऱ्यांना पुरेशी कल्पना नाही. पुरेसे कर्मचारी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. यामुळे मुंबईतील सर्व विवाह मंडळांची नोंद झाल्याची खात्री देता येत नाही.

विवाह कायद्यात 1999 मध्ये केलेल्या तरतुदीनुसार विवाहित जोडपी आणि विवाह मंडळांनी नोंद न केल्यास त्यांच्यावर कारवाई करता येते. तुरुंगवास किंवा पाच हजारांचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. पाच मे 2016 पर्यंत विवाह मंडळांनी नोंदणी न केल्यास पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पालिकेच्या प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजवर कुणालाही शिक्षा झालेली नाही. पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे पालिका अधिकारी सगळीकडे फिरून नोंदणी न झालेल्या विवाह मंडळांची माहिती घेऊ शकत नाहीत.

गल्ली-बोळांतील विवाह मंडळे
यंत्रणा अपुरी पडत असल्याने गल्ली-बोळांतील विवाह मंडळांपर्यंत पालिका अधिकारी पोहचू शकत नाहीत. घरातूनच चालवल्या जाणाऱ्या विशिष्ट जातीधर्माच्या विवाह मंडळांविषयी अद्याप पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे माहिती नाही.

Web Title: 200 marriage mandal register