अग्निशमन दलातर्फे  200 जणांची पुरातून सुटका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

वसई-विरार परिसरात मुसळधार पावसाने कहर केला असतानाच पालिकेच्या अग्निशमन दलाने मात्र पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अथक परिश्रम करून 200 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.

विरार ः वसई-विरार परिसरात मुसळधार पावसाने कहर केला असतानाच पालिकेच्या अग्निशमन दलाने मात्र पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अथक परिश्रम करून 200 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. त्याचबरोबर वसई पूर्वेला असलेल्या मिठागरात अडकलेल्यांना अन्न आणि पाण्याची सोय करून दिली आहे. 

सहा दिवसांपासून पालघर जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले होते, तर बाजूच्या नद्यांना पूर येऊन पुलावर पाणी आल्याने त्यात अनेक लोक अडकले होते. अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने एनडीआरएफची टीमही बोलावली होती. या टीमप्रमाणेच पालिकेचे अग्निशमन दलदेखील अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करत होते.

अग्निशमन दलाने भोयदापाडा, नवसई, भाताने, सायवन, एव्हरशाईन या भागांत अडकलेल्या 200 जणांना बाहेर काढण्यात यश मिळवले. एव्हरशाईन सिटीजवळ बसमध्ये जवळपास चार तास अडकलेल्या आजीबाईंनाही या दलाने सुखरूप बाहेर काढले. रविवारी (ता.4) जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांनी पुरात अडकलेल्यांना मदतीचा हात दिला होता, तर आज सकाळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठिकठिकाणी पाहणी करून पूरस्थितीचा आढावा घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 people rescued by firefighters in Vasai flood near Mumbai