जिल्हा परिषद शाळेत क्रीडा सुविधांचा पोर‘खेळ’ 

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

शाळेसमोरील मैदान गायब; पालकांसह शिक्षकही नाराज

खारघर : शाळा म्हटले की, शिक्षणाबरोबर विविध खेळ आलेच. त्यात पटांगणातील खेळामुळे मुलांच्या शरीरास व्यायाम मिळतो, शरीर बळकट बनण्यास साह्य होते. मुलांची मानसिक वाढ होण्यास मदत होते. शिवाय शाळेतूनच खेळाडू तयार होतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक हुशार विद्यार्थी आहेत. त्यांच्या खेळात चांगली धमक आहे; परंतु योग्य व्यासपीठ त्यांना मिळत नसल्याने त्यांचा विकास खुंटला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाचा प्रसार व्हावा, खेळाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळेत मैदान असणे महत्त्वाचे आहे; मात्र खारघर परिसरातील जिल्हा परिषद शाळेसमोरील मैदानेच गायब झाल्याने मुलांनी खेळायचे तरी कुठे, असा प्रश्न शिक्षक आणि पालकांना पडला आहे.

खारघर परिसरातील बेलपाडा, कोपरा, मुर्बी, खारघर, फरशीपाडा आदी जिल्हा परिषद शाळेच्या समोर पूर्वी मुलांना खेळण्यासाठी मैदाने होती; मात्र खारघरचे रूपांतर शहरात झाले. कौलारू घरांच्या जागी टोलेजंग इमारती झाल्या. घरोघरी वाहने आली; मात्र वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने वाहनचालकांनी मुलांच्या मैदानावरच कब्जा केला आहे. त्यामुळे शिक्षकांना मुलांसाठी खेळ घेता येत नाहीत. परिणामी शालेय मुलांना खेळापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत शिक्षकांनी बोलून दाखवली.  

शाळेसमोर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालक अथवा मालकांवर पनवेल पालिकेने मोहीम राबवून कारवाई करावी; त्याशिवाय शाळेसमोरील मैदान मोकळे होणार नाही. 
- संतोष तांबोळी, 
सामाजिक कार्यकर्ता, कोपरा गाव

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा