21 टक्के विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य क्षेत्राकडे ; महाकरिअर मित्र पोर्टलवर अहवाल उपलब्ध

21 टक्के विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य क्षेत्राकडे ; महाकरिअर मित्र पोर्टलवर अहवाल उपलब्ध

मुंबई : दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कलचाचणी २०१८ चा अहवाल आज जाहीर करण्यात आला असून २०१८ मध्ये  १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली आहे. या वर्षी २०१८ मध्ये वाणिज्य म्हणजेच (commerce) क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल हा सर्वाधिक दिसून येत आहे. 

या कलचाचणीचा सविस्तर अहवाल www.mahacareermitra.in वर उपलब्ध असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी यंदा दहावीच्या परीक्षेसाठी बसलेले काही विद्यार्थी उपस्थित होते.

दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणी २०१८ चा अहवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज जाहीर केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचायला मदत करणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याचा दृष्टीकोन महाराष्ट्र शासनाचा आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये कलचाचणी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच देण्याचा शासनाचा मनोदय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२०१८ या वर्षामध्ये  १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली.  ही कल चाचणी विद्यार्थ्यांचे ७ प्रमुख क्षेत्रातील कल चे परीक्षण करते. २०१७ च्या कल चाचणी अहवालानुसार विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा ललितकला म्हणजेच fine artsया क्षेत्रात सर्वाधिक दिसून आला होता. तर या वर्षी २०१८ मध्ये वाणिज्य म्हणजेच commerce क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल हा सर्वाधिक दिसून येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्दिष्ट्याने २०१६पासून राज्य शासनाच्या १० वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा उपक्रम सुरु करण्यात आला. ज्याअंतर्गत या मुलांचा कल ओळखू शकणारी कल चाचणी घेण्यात आली, दहावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे असेही तावडे यांनी सांगितले.

कलचाचणी हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांचा संयुक्त प्रकल्प असून 'श्यामची आई फाऊंडेशन'' हे CSR च्या सहाय्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्य करीत आहे. कलचाचणी प्रत्येक विद्यार्थ्याला करिअर  निवड करण्यास मदत करते. मनुष्यबळविकास मंत्रालयाने या प्रकल्पाचे एक उत्कृष्ट उपयोजित प्रकल्प म्हणून कौतुक केले आणि ४ इतर राज्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

विद्यार्थी त्यांच्या SSC board क्रमांकाच्या आधारे त्यांचा कल चाचणी अहवाल ऑनलाईन प्राप्त करू शकतात, त्यासाठी www.mahacareermitra.in या पोर्टलवर जाऊन मुखपृष्ठावर त्यांनी आपला हा क्रमांक प्रविष्ठ केल्यानंतर त्यांना त्यांचा कल चाचणी चा अहवाल मिळू शकेल, हा अहवाल विद्यार्थी डाऊनलोड करु शकतात. याचसोबत त्यांचा कल ज्या क्षेत्रात आला आहे त्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ ते पाहू शकतात.

शिवाय प्रत्येक क्षेत्रनिहाय माहितीपर व्हिडिओ आणि प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ ही या पोर्टलवर उपलब्ध आहेत. ज्याचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात. तसेच त्यांच्या आवड क्षेत्रानुसार त्यांच्या जिल्ह्यातील अभ्यासक्रमांचा शोध ही त्यांना या पोर्टलद्वारे घेता येऊ शकतो. पोर्टलवर ७० हजारांहून अधिक शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

याशिवाय विद्यार्थ्यांना कल अहवालाबाबत शालेय स्तरावर अधिक मार्गदर्शन मिळावे या हेतूने ,महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने १२ हजार शासकीय व शासन अनुदानित माध्यमिक विद्यालायांमधील एक मुख्याध्यापक व २ शिक्षक यांना ‘अविरत’ या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यामतून प्रशिक्षित केले आहे. याद्वारे ४१,६०७ शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. 

पुढील मार्गदर्शनासाठी, विद्यार्थी पोर्टलवर दिलेल्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा शैक्षणिक सातत्यापूर्ण व्यावसायिक विकास संस्था (District Institute Of Educational Continuous Professional Development – DIECPD)  केंद्रांशी संपर्क साधू शकतात.

याशिवाय, इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी "स्वविकास व कलारसास्वाद" हा अनिवार्य श्रेणी विषय देखील सुरू करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकाने करिअर मार्गदर्शन आणि २१ व्या शतकात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी जीवनकौशल्ये यांचा पाया तयार केला आहे.

यावेळी दहावीची परीक्षा दिलेली विविध शाळांमधील काही निवडक विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी या विद्यार्थ्यांनी www.mahacareermitra.in या पोर्टलवर जाऊन मुखपृष्ठावर त्यांनी आपला दहावी परिक्षेचा क्रमांक टाकला व आपला कलचाचणीचा अहवाल घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com