मिनी ट्रेन एक वर्षभर बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

मिनी ट्रेन बंद झाल्यामुळे येथील पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे. दर महिन्याला एक लाख पर्यटक येतात; मात्र 27 जुलैला नेरळ-माथेरान आणि माथेरान-अमनलॉज या दोन्ही सेवा बंद झाल्यानंतर 27 जुलैपासून 27 ऑगस्टपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत अवघे 39 हजार 38 पर्यटक दाखल झाले आहेत. 

माथेरान : गेल्या काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी 20 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ही सेवा एक वर्षासाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे; पण अमन लॉज - माथेरान शटल सेवा काही दिवसांत सुरू होणार आहे. 

26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीत माथेरान घाटात रेल्वे मार्गावर 35 ठिकाणी दरड कोसळली होती. त्या वेळी 18 कोटींचा खर्च करून तब्बल 20 महिन्यांनंतर मिनी ट्रेन पूर्वपदावर आली होती. या वर्षीही अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे तिच्या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. 

मिनी ट्रेन बंद झाल्यामुळे येथील पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे. दर महिन्याला एक लाख पर्यटक येतात; मात्र 27 जुलैला नेरळ-माथेरान आणि माथेरान-अमनलॉज या दोन्ही सेवा बंद झाल्यानंतर 27 जुलैपासून 27 ऑगस्टपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत अवघे 39 हजार 38 पर्यटक दाखल झाले आहेत. 

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी सांगितले की, 2005 मध्ये मिनी ट्रेन मार्गाची दाणादाण झाली होती. तेवढी बिकट परिस्थिती आता नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची मानसिकता असेल, तर ही तीन महिन्यांत दुरुस्ती पूर्ण होऊ शकते. 

या वर्षी 27 जुलैला जोरदार अतिवृष्टी झाली. तब्बल 440 मिलिमीटर पाऊस एका दिवसात पडला. या वेळी रेल्वे मार्गावर फार मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. रेल्वेरुळाखालील जमीन वाहून गेल्याने फार मोठी हानी झाली आहे. 21 किलोमीटर घाट मार्ग असल्याने या भागात दुरुस्तीचे काम जिकिरीचे आहे. कोट्यवधींचा खर्च येणार आहे. 
- ए. के. सिंग, जनसंपर्क अधिकारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा