पपनस नामशेष होण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

कोकण किनारपट्टीवर 30-40 वर्षांपूर्वी पपनसची मोठ्या संख्येने झाडे होती. आता त्याचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. मुरूड तालुक्‍यातील मुरूड, नांदगाव गावांमध्ये त्याची झाडे आहेत. काकळघर आणि भोईघर येथे अल्प प्रमाणात झाडे आहेत.

मुरूड : गौरी-गणपतीत दूर्वा, जास्वंदीच्या फुलांएवढीच मागणी असलेल्या पननसाला सध्या बहर आला आहे. रायगड जिल्ह्यात या फळांच्या उत्पादनात मुरूड आणि नांदगाव आघाडीवर असले तरी नैसर्गिक संकटाबरोबरच अन्य कारणांमुळे ही झाडे नामषेश होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत उत्पादनात दरवर्षी 5 टक्के घट होत आहे. यंदा या फळांची 15 लाखांची उळाढाल झाली आहे. 

कोकण किनारपट्टीवर 30-40 वर्षांपूर्वी पपनसची मोठ्या संख्येने झाडे होती. आता त्याचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. मुरूड तालुक्‍यातील मुरूड, नांदगाव गावांमध्ये त्याची झाडे आहेत. काकळघर आणि भोईघर येथे अल्प प्रमाणात झाडे आहेत. बागायतदारांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्‍यात सध्या सुमारे 300 झाडे आहेत. हे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे उत्पन्नातही सुमारे 5 टक्के घट होत आहे. अलिबाग तालुक्‍यातील रेवदंडा येथे काही झाडे आहेत. एक झाड दरवर्षी 4 ते 5 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून देते. 

मुरूड तालुका शेतकरी गटप्रमुख उल्हास वारगे यांनी सांगितले की, पपनसाची झाडे कमी होत आहेत. यंदा तालुक्‍यात सुमारे 15 लाखांचे मिळाले. कृषी विद्यापीठाने गोड पपनसाची नवीन जात विकसित केली आहे. त्याची फळे गोड आहेत. त्याची लागवड केल्यास उत्पन्न वाढू शकते. सुरेश वर्तक या शेतकऱ्याने सांगितले की, पपनसाचे झाड अधिक जागा व्यापते. गौरी आणि नवरात्राव्यतिरिक्त मागणी नसते, त्यामुळे बागायतदारांनी झाडे कमी केली आहेत. 

मुरूड येतील जयश्री जोशी यांनी सांगितले की, बागेत पपनसाची 40 वर्षांपूर्वीची 3 झाडे आहेत. या झाडांसाठी सेंद्रिय खताचा वापर करतो. ग्राहक घरी येऊन फळांची खरेदी करतात. सामाजिक कार्यकर्ते जाहिद फकजी यांनी सांगितले की, पपनसाचे फळ कुटुंबीय आवर्जून खातात. 
 
आंबा, काजू, नारळ, सुपारी या लागवडीसाठी सरकार अनुदान देते. परंतु पपनसचा इतर फळवर्गात समावेश असल्याने प्रोत्साहनपर योजना नाही. 
- एस. सी. नामदास, कृषी अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा