रायगडमध्ये भात पीक पाण्यावर तरंगले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

रायगड जिल्ह्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने माघारी जाताना हजेरी लावली. शनिवारपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने दणका दिल्यामुळे परिपक्व झालेली भाताची रोपे आडवी पडली. कापणी केलेली भाताची रोपे पावसाच्या पाण्याने भिजून गेली. शेतांमध्ये पाणी भरल्याने भाताची रोपे पाण्यावर तरंगू लागली आहेत. हा पाऊस 28 ऑक्‍टोबरपर्यंत सुरूच राहील, असा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत. 

अलिबाग, ता. 23 : रायगड जिल्ह्यात जुलै ते ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने 21 हजार 550 हेक्‍टर भातशेतीला तडाखा दिला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसाने सुमारे 2000 हेक्‍टर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने माघारी जाताना हजेरी लावली. शनिवारपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने दणका दिल्यामुळे परिपक्व झालेली भाताची रोपे आडवी पडली. कापणी केलेली भाताची रोपे पावसाच्या पाण्याने भिजून गेली. शेतांमध्ये पाणी भरल्याने भाताची रोपे पाण्यावर तरंगू लागली आहेत. हा पाऊस 28 ऑक्‍टोबरपर्यंत सुरूच राहील, असा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत. 

रायगड जिल्ह्यात एक लाख 14 हजार हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीची कामे झाली. या वर्षी पावसाने जोरदार सुरुवात केल्याने नदी-नाले भरून वाहू लागले; मात्र पावसाच्या माऱ्यामुळे घरांची पडझड झाली, भाताची रोपे वाहून गेली. भाताच्या पिकाखालील सुमारे 15 हजार हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आणि 50 हजार शेतकऱ्यांना फटका बसला. 

त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी मोठ्या उमेदीने पुन्हा उभा राहिला. वाचलेल्या पिकातून काही तरी हाती लागेल, अशी आशा त्याला होती. जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी भाताची कापणी सुरू झाली. हे काम 20 टक्‍क्‍यांहून अधिक झालेले असताना शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या घासावर परतीच्या पावसाने घाला घातला. संततधार सुरू राहिल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले. अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, म्हसळा, माणगाव आदी अनेक तालुक्‍यांत ढगाळ वातावरणासह सरी कोसळत होत्या. 
या पावसामुळे कापणी केलेली भातपिके पाण्याखाली गेल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अलिबाग, पोलादपूर, तळा, पनवेल, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आदी अनेक तालुक्‍यांतील 2000 हेक्‍टर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस 28 ऑक्‍टोबरपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

भरपाई हेक्‍टरी 20 हजारांवर 
अवेळी पाऊस, अतिवृष्टी (65 मिमीपेक्षा जास्त), पूर, उधाण, वादळवारा, गारपीट आदी कारणांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते. शेतकऱ्यांना पूर्वी हेक्‍टरी 6800 रुपये दराने नुकसानभरपाई मिळत होती. सरकारने सप्टेंबरपासून नुकसानभरपाईत तिपटीने वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्‍टरी सुमारे 20 हजार 400 रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा