महामार्गालगतचे २३० बार बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

नवीन पनवेल - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेल महामार्गालगतचे २३० बार व देशी बार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे १५ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत; तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल उरण परिसरातून तब्बल दीडशे कोटींचा महसूल बुडणार आहे.

नवीन पनवेल - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेल महामार्गालगतचे २३० बार व देशी बार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे १५ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत; तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल उरण परिसरातून तब्बल दीडशे कोटींचा महसूल बुडणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून महामार्गाला लागून २०० मीटरच्या आत असलेले सर्व बिअर बार, शॉप बंद करण्यात येणार आहेत. ज्या गावची लोकसंख्या २० हजारच्या आत आहे, त्या ठिकाणी सगळ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून २२० मीटरवरील तसेच २० हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ५०० मीटर अंतरावरील बार व बिअर शॉपी बंद करण्यात आले आहेत. पनवेल परिसरातील कळंबोली ते कोनदरम्यानचे व राज्य महामार्गाला लागून असलेले २३० बार व देशी बार बंद करण्यात आले आहेत. राज्य भरारी पथकाने परमिट रूम सील करण्यात आले आहेत. 

हॉटेल व बार व्यवसायात आम्ही पैसा गुंतवला आहे. यावर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बारला संरक्षण मिळाले पाहिजे. राज्य महामार्गालगतच्या बारला कारवाईतून वगळले पाहिजे, अशी संघटनेची मागणी आहे. याबाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची लवकरच भेट घेण्यात येईल.

- दयानंद शेट्टी, अध्यक्ष, नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशन

पनवेल उरण परिसरातून सेल्स टॅक्‍स, आयकर, सर्व्हिस टॅक्‍स असा मिळून अंदाजे दीडशे कोटींचा महसूल कमी होणार आहे.
- सुधीर पोकळे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल

सुमारे १५  हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे या निर्णयाबाबत सरकारने नियम थोडे शिथिल करावेत. 
- गोपाळ शेट्टी, मालक, सन शाईन बार

लोकांची मानसिकता बदलली, तरच हा प्रश्न सुटू शकतो. महामार्गावर ५०० मीटर अंतरावर असलेल्या बारवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे फार परिणाम होईल, असे वाटत नाही.
- प्रतीक्षा पवार-देवत, गृहिणी

Web Title: 230 bar off Neighboring Highway