फराळ ताटातून अनारसे गायब

सुनील पाटकर
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

अनेक महिला या नोकरी-व्यवसाय करत असतात. त्यामुळे त्यांना नारसे सारख्या पाककृतीसाठी आवश्‍यक असणारा वेळ देता येत नाही. बदलत्या काळानुसार सुगरणींची कमतरताही जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक महिला अनारसे करणे टाळू लागलेल्या आहेत. याचा परिणाम दिवाळीतील फराळांमध्ये दिसू लागला आहे

महाड  : दिवाळी फराळात अतिशय महत्त्वाचा पदार्थ म्हणून अनारशाला स्थान आहे; पण तो आता या ताटातून गायब झाला आहे. वेळेचा अभाव, क्‍लिष्ट पाककृतीमुळे अनेक सुगरणींनी यंदा त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळेच हा पदार्थ भविष्यात विस्मरणात जाण्याची शक्‍यता आहे. 

दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करून फराळाची ताटे समोर आली की सारे जण त्याचा मनसोक्त आस्वाद घेतात. लाडू, करंजी, चिवडा, कडबोळी, शंकरपाळे, चकली, शेव या पदार्थांसोबत अनारसाही असतो. काहींची पहिली पसंती अनारसा असते. रुचकर असा हा पदार्थ यंदा फराळाच्या ताटातून गायब झाला. काहींनी त्याची चवही घेतली नाही. पूर्वी अनेक महिला घरोघरी वेळ काढून अनारसे बनवत असत. तो तयार करण्याची प्रक्रिया किचकट आहे. त्यासाठी सहा-सात दिवसांचा कालावधी लागतो. शिवाय अनारसे बनवणारी महिला सुगरण असेल तरच तो चविष्ट व जाळीदार होतो.

परंतु सध्या अनेक महिला या नोकरी-व्यवसाय करत असतात. त्यामुळे त्यांना या पाककृतीसाठी आवश्‍यक असणारा वेळ देता येत नाही. बदलत्या काळानुसार सुगरणींची कमतरताही जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक महिला अनारसे करणे टाळू लागलेल्या आहेत. याचा परिणाम दिवाळीतील फराळांमध्ये दिसू लागला आहे. फराळात अनारसे आता कमी दिसू लागले आहेत. बाजारातही एक अनारसा 15 ते 20 रुपयांना मिळत असल्याने ते विकत घेणे परवडत नाही. बाजारामध्ये हा पदार्थ तयार करण्याचे पीठही मिळते. परंतु त्यातूनही अनारसे करणे सहजासहजी जमत नाही. यामुळे दिवाळीतील एक गोड पदार्थ फराळाच्या यादीतून मागे पडू लागला आहे. 

अनारसे तयार करण्यासाठी तांदूळ, गूळ, तूप, खसखस आणि तळण्यासाठी तेल एवढेच साहित्य लागते. तरीही त्याची पाककृती अवघड असते. ते जाळीदार असणे चांगल्या सुगरणीचे लक्षण मानले जात असे. 

असे करतात अनारसे 
अनारसे तयार करण्यासाठी तीन दिवस तांदूळ पाण्यात भिजवून ठेवतात. प्रत्येक दिवशी हे पाणी बदलावे लागते. चौथ्या दिवशी ते कोरडे करून मिक्‍सरमध्ये बारीक करून नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे, किसलेला गूळ आणि 1 चमचा तूप, चाळलेल्या बारीक तांदळात घालून मळतात. घट्ट मळलेला गोळा 5-6 दिवस डब्यात भरून ठेवतात. त्यानंतर पिठाच्या पुऱ्या करून त्या खसखशीवर लाटतात. 
अनारसे तळणे हीही एक कला असते. अशा मेहनतीनंतर अनारसे तयार होतात. ते खूप दिवस टिकतात. 

अनारसे तयार करण्याठी खूप वेळ लागतो; परंतु हे आव्हान समजून महिलांनी करावेत. आपला पारंपरिक पदार्थांचा वारसा जपला पाहिजे. नाही तर एका चांगल्या पदार्थाला भावी पिढी मुकेल. 
- वैशाली जोशी, गृहिणी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा