जिल्हा सामान्य रुग्णालयात अर्भकाच्या मृत्यूने तणाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

डॉक्‍टरांनी हलगर्जी केल्याचा नातेवाईकांचा आरोप

ठाणे : फुफ्फुसाला असलेल्या फुगवट्यामुळे श्वास घेण्यात अडथळा निर्माण होऊन एका अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ३) सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. परंतू अर्भकाचा मृत्यू हा रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मृत अर्भकाच्या नातेवाईकांनी केल्याने काही वेळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रविवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने मातेच्या गर्भाशयाला होणारा धोका व अर्भकाची हालचाल पाहून डॉक्‍टरांनी महिलेच्या पतीची परवानगी घेऊन शस्त्रक्रिया करून प्रसूती केली.

प्रसूतीदरम्यान अर्भक दगावल्याचे आढळून आले; मात्र सदर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्यामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.

अर्भक कमी दिवसांचे असल्यामुळे त्याच्या फुफ्फुसाची वाढ झालेली नव्हती. त्यातच फुफ्फुसाला असलेल्या फुगवट्यामुळे त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला आणि अर्भकाचा मृत्यू झाला.
- डॉ. प्रसन्ना देशमुख
, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

टॅग्स