पाण्याची थकबाकी तब्बल 233 कोटी 90 लाख रुपये; मध्य आणि पश्चिम रेल्वे महापालिकेच्या डिफॉल्टर यादीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी होती. सदर बंगल्यांना पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले होते.

मुंबई : मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी आपल्या शासकीय बंगल्याचे लाखो रुपयांचे पाणी बिल थकवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनेही पालिकेचे पाणी बिल थकवल्याचे प्रकरण समोर आले आहे. पाण्याची ही थकबाकी हजार रुपये किंवा काही लाख रुपये नाही, तर तब्बल 233 कोटी 90 लाख रुपये एवढी अवाढव्य आहे. यामुळे महापालिकेने कारवाई करत मध्य आणि पश्चिम रेल्वेला डिफॉल्टर यादीत टाकले आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागविली होती. याबाबत माहिती अधिकरी तथा कार्यकारी अभियंता जलमापके (महसूल) यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे. या माहितीनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे तब्बल 233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपयांची थकबाकी आहे.

तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण 122 जलजोडणीला डिफॉल्टर यादीत टाकले आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या 67 जलजोडण्यांचा समावेश आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या 55 जलजोडण्यांचा समावेश आहे. मध्ये रेल्वेची तब्बल 103 कोटी 18 लाख 56 हजार 124 रुपयांची थकबाकी आहे, तर पश्चिम रेल्वेची तब्बल 130 कोटी 72 लाख 36 हजार 838 रुपयांची थकबाकी आहे. 

यापूर्वी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी होती. सदर बंगल्यांना पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास सर्व थकबाकीच्या पैश्यांचा भरणा महापालिकेकडे केला आहे. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते, जर शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल, तर सामान्य जनतेने का भरावे? तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सारख्या रेल्वे विभागही पाण्याची थकबाकीचे पैसे भरणार का? असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी विचारला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 233 crores 90 lakhs rupees pending bill of water to Central and Western railway