सुक्‍या मासळीचा बाजार गरम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

ऑगस्टपासून वादळाचा तडाखा बसत आहे. या हंगामात 6 वेळा मारा सहन करून मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे बाजारात माशांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम सुक्‍या मासळीच्या बाजारात दिसत आहे. 

रोहा : अरबी समुद्रातील वादळे, मत्स्यदुष्काळ आणि लांबलेला पावसाळा यामुळे यंदा सुक्‍या मासळीचा बाजार गरम झाला आहे. आवक घटल्याने जिल्ह्यातील मोठ्या बाजारांपासून आठवडा बाजारांत या माशांच्या किमती तब्बल 30 पासून 100 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्या आहेत. 

ऑगस्टपासून वादळाचा तडाखा बसत आहे. या हंगामात 6 वेळा मारा सहन करून मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे बाजारात माशांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम सुक्‍या मासळीच्या बाजारात दिसत आहे. 

मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार वादळाबरोबर लांबलेल्या पावसाने सुकत टाकलेल्या मासळीचे नुकसान केले. त्यामुळे या मासळीचे दर वाढले आहेत. जवळ्याचे दर दुप्पट झाले आहेत. मागच्या वर्षी जवळा 150 ते 200 रुपये किलोने विकला गेला होता. तो या वर्षी 300 ते 400 रुपये किलोने विकला जात आहे. वाखटी, बोंबील आणि मासी सुकट मागच्या वर्षी 300, तर या वर्षी 400 रुपये प्रति किलोने आहे. 

मुशी, ढोमी आणि भेळ सुकट मागच्या वर्षी 200; तर या वर्षी 300 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. करंदी सुकट मागच्या वर्षी 300 रुपये प्रति किलो; तर आता 600 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. सुक्‍या मासळीचे भाव बेसुमार वाढल्याने ग्राहकांनी खरेदीत हात अखडता घेतला असल्याचे विक्रेते सांगतात. 

सुक्‍या मासाळीतून माकोल गायब 
दरवर्षी सुक्‍या मासळीत हमखास दिसणारे माकोल या वर्षी गायब आहेत. अतिवृष्टी आणि वादळी हवामान यामुळे किनारी भागात उगवणारे एक विशिष्ट प्रकारचे शेवाळ या वर्षी वाहून गेले; त्यामुळे माकोल किनाऱ्याला आले नाहीत, अशी माहिती श्रीवर्धन येथील मच्छीमार ज्ञानेश्वर वाघे यांनी दिली. 

साजगावात स्वस्ताई 
रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारात सुकी मासळी महाग असली तरी साजगावच्या यात्रेत त्या तुलनेत ही मासळी स्वस्त आहे. मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने भाव कमी आहेत, असे समजते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा