राजधानीत वर्षभरात 24 हुंडाबळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

या वर्षी ऑक्‍टोबरपर्यंत हुंड्यासाठी दोन विवाहितांच्या हत्या झाल्या आहेत; तर 24 महिलांचा आत्महत्या व इतर कारणांमध्ये मृत्यू झाला आहे. 10 महिन्यांत 421 हुंडापीडितांच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल झाले आहेत. 

मुंबई  - हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा तिची हत्या करणे, असे प्रकार देशाच्या आर्थिक राजधानीतही घडत आहेत. या वर्षी ऑक्‍टोबरपर्यंत हुंड्यासाठी दोन विवाहितांच्या हत्या झाल्या आहेत; तर 24 महिलांचा आत्महत्या व इतर कारणांमध्ये मृत्यू झाला आहे. 10 महिन्यांत 421 हुंडापीडितांच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल झाले आहेत. 

या वर्षी हुंड्यासाठी दोन महिलांची हत्या करण्यात आली; तर 16 महिलांनी आत्महत्येचा पर्याय निवडून स्वत-चे आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, तर लग्नाच्या सात वर्षांच्या आतच आठ महिलांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. 

छळाची कारणे 
लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला. गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणले नाहीत. चरित्र्यावर संशय अशा असंख्य कारणांवरून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ होण्याच्या घटना दररोज घडतात. त्यातील काही घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचतात; तर काही सामंजस्याने मिटवल्या जातात. असे प्रकार खेडोपाड्यांत मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आतापर्यंत शहरी माणसांचा समज होता; मात्र बदलत्या मानसिकतेनुसार शहरी भागांतही हुंडाबळीच्या गुन्ह्यांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वर्षी महिलांचा छळ केल्याप्रकरणी मुंबई शहर पोलिसांकडे 421 गुन्हे दाखल झाले आहेत. 

वर्ष 2016 
गुन्ह्यांची नोंद - 602 
आत्महत्या - 28 
अत्याचाराचे बळी - 8 
वर्ष 2017 
कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे - 467 
विवाहितांच्या आत्महत्या - 16 
हुंड्यासाठी हत्या - 2 

Web Title: 24 dowry cases in the mumbai in this year