पालिकेचे 'सुपर 24' विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

सुपर 30 चित्रपटात सामान्य घरातील विद्यार्थी मेहनतीने आयआयटीमध्ये प्रवेश मिळवतात, याचप्रमाणे मुंबई पालिकेच्या शाळांत शिकणा-या सामान्य घरातील २४ विद्यार्थ्यांनी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदके पटकावत या चित्रपटाची पुनरावृत्ती केली आहे.

मुंबई, ता. 16 (बातमीदार) : सामान्य कुटुंबातील मुलांनी जागतिक पातळीवरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी, यासाठी गतवर्षीपासून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली होती. या प्रोत्साहनाला दुसऱ्याच वर्षी यश आले असून यंदाच्या ऑलिम्पियाड स्पर्धेत पालिका शाळेतील तब्बल २४ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत "हम भी किसी से कम नही'चा प्रत्यय दिला आहे. 

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव लागू शकत नाही, असा सर्वसामान्यांमध्ये समज आहे; परंतु पालिकेतील शाळांमधील मुलांनी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे, यासाठी गतवर्षीपासून प्रयत्न करण्यात येत होते. त्यानुसार केंब्रिज युनिव्हर्सिटीअंतर्गत इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांसाठी घेतल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाड स्पर्धेत विद्यार्थ्यांना उतरवण्यास सुरुवात करण्यात आली.

गतवर्षी चाचपणी करण्याच्या उद्देशाने काही विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड स्पर्धेत सहभागी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या तयारीचा अंदाज आल्यानंतर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल ६२२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून प्रादेशिक फेरीसाठी ५६८  विद्यार्थी पात्र ठरले. प्रादेशिक फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधून १५० विद्यार्थी राष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरले.

यानंतर राष्ट्रीय फेरीत सहभागी झालेल्या १५० पैकी २४ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. सामान्य कुटुंबातील मुलांना जागतिक पातळीवर स्पर्धेत उतरवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने २०१७-१८ मध्ये घेतलेला निर्णय या विद्यार्थ्यांनी सार्थ ठरवून दाखवला आहे. सुवर्णपदक पटकावलेल्या २४ विद्यार्थ्यांचा १४ ऑगस्ट रोजी कलेक्‍टर कॉलनी महापालिकेच्या शाळेत सत्कार करण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 students from municipality school won gold medal in olympiad Competition