म्हणून सुक्‍या मासळीला मानाचे स्थान 

म्हणून सुक्‍या मासळीला  मानाचे स्थान 

अलिबाग ः रायगड जिल्हा पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे, तेवढाच तो स्वादिष्ट ताज्या मासळीसाठी. त्यामुळे ही चव चाखल्याशिवास अस्सल खवय्ये परतीचा प्रवास करत नाहीत. पण, आता ताज्या मासळीच्या जोडीला हॉटेल, कॉटेजमधील मेनूकार्डवर सुक्‍या मासळीच्या पदार्थांनाही मानाचे स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे पर्यटकांचीही त्याला मोठी पसंती मिळू लागली असल्याने व्यावसायिक खूश आहेत. 

सुके बोंबील, सुकट, मांदेली, वाकटी अशा सुक्‍या माशांचे नाव निघाले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. या माशांपासून तयार केलेले खास कोळी, आगरी पद्धतीने केलेल्या चमचमीत पदार्थांची चव तर अनेक दिवस जिभेवर रेंगळते. त्यामुळे ग्राहकांची ही आवड लक्षात घेवून रायगड जिल्ह्यातील हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांनी या माशांपासून वेगळ्या पद्धतीने पदार्थ तयार केले आहेत. त्यांना जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचीही चांगली पसंती मिळत आहे. 

याबाबत विक्रेत्यांनी सांगितले, की ओली मासळी फ्रीजमध्ये ठेवावी लागते, ती काही दिवसांत खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे सुकी मासळी हा चांगला पर्याय आहे. त्याला पसंती मिळत आहे. त्यामुळे आता एकापाठोपाठ अनेक हॉटेलमध्ये हे पदार्थ आवर्जून देण्यात येत आहेत, असे हॉटेल व्यावसायिक सांगतात. 
ग्राहकांच्या मागणीनुसार केव्हाही या मासळीचे पदार्थ तयार करून देता येतात. त्यांचे दरही ग्राहकांच्या खिशाला परवडण्यासारखे असतात, अशी माहितीही त्यांनी दिली. 

हॉटेलमध्ये ओल्या मासळीचे जेवण 400 ते 500 रुपयांना मिळते. पण, सुक्‍या मासळीचे ताट त्यापेक्षा किती तरी स्वस्त म्हणजेच अवघ्या 150 रुपयांपर्यंत मिळते. त्याची चवही खूपच चांगली असते. त्यामुळे त्याला पसंती देतो, असे मुंबईतील पर्यटक सदानंद जावळे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

सुकी मासळीची साठवणूक करणे सोपे असते. त्याचबरोबर ती कोणत्याही हंगामात वापरता येते. ग्राहकांच्या मागणीनुसार पदार्थ करून कमीत कमी वेळेत त्यांना देता येतात. अपेक्षेनुसार ग्राहक आले नाहीत तरी होणारा तोटा खूपच कमी असतो. त्यामुळे असे पदार्थ तयार करण्यास पसंती देतो. कमी दरात चांगले पदार्थ मिळत असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. 
- किशोर ठाकरे, जय योगेश्‍वर हॉटेल, अलिबाग बीच 

अलिबाग तालुक्‍यातील स्थानिकांच्या दररोजच्या जेवणात तांदळाची भाकरी आणि सुकटीचा झणझणीत ठेचा हा ठरलेला पदार्थ आहे. वर्षभर सुक्‍या मासळीचे पदार्थ खाता येतात. हेच वैशिष्ट्य हेरून सुक्‍या मासळीच्या पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. ते ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. 
- सिद्धार्थ मुकादम, गुरुकृपा खानावळ, अलिबाग  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com